१६ ऑक्टोबर हा जागतिक भूलशास्त्र दिवस. या निमित्ताने भूलशासत्राचा इतिहास सांगत आहे नाशिकच्या सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. अनिता नेहेते.
आजच्या काळात अशी कोणी व्यक्ती नसेल की ज्याचा कधी न कधी स्वतः साठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी भूलतज्ञाशी संबध आला नसेल पण आपल्याला भूलतज्ञ किंवा भूलशास्त्रा विषयी कितपत माहिती आहे ? कोण असतात हे भूलतज्ञ ? आणि कशी झाली भूलशास्त्राची सुरवात चला जाणून घेवूया.
दिडशे वर्षाचा इतिहास:
१६ ऑक्टोबर हा जागतिक भूलशास्त्र दिवस हा साजरा होतो. जवळपास दीडशे वर्षापूर्वी म्हणजे १६ ऑक्टोबर १८४६ रोजी जगातील पहिली भूल यशस्वीरित्या दिली गेली आणि या भूलशास्त्राचा पाया रचला गेला. या दिवशी डॉ. विल्यम मॅार्टन यांनी अमेरिकेतील बोस्टन येथे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पीटल मध्ये एका रुग्णाला मानेवरील गाठ काढण्यासाठी ‘इथर’ नावाचे भूलेचे औषध दिले व जगातील पहिली वेदानारहित शस्त्रक्रिया पार पडली.
पूर्वी दारू किंवा अफू याचा वापर:
त्या आधी भूल न देताच शस्त्रक्रिया करत असत म्हणजे दारू किंवा अफू ची गोळी देऊन, हात पाय बांधून शस्त्रक्रिया केली जाई. रुग्णाला अतिशय वेदना होत असत. बरेचदा रुग्ण दगावतही असे. परंतु या दिवसा नंतर शस्त्रक्रियेसाठी सुरक्षित अशी भूल देता येते हे सिद्ध झाले. ज्या ठिकाणी ही भूल देण्यात आली ते ठिकाण ‘इथर डोम’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर सात वर्षांनी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला प्रसूती वेदना टाळण्यासाठी ‘क्लोरोफॉर्म’ हे औषध दिले गेले व भूलशास्त्र व भूलतज्ञ हे विषय सामान्य लोकांपर्यंत पोहोचले.
भूलशास्त्राचा हा इतिहास अतिशय रंजक आहे. त्या आधीही बरेच प्रयोग झाले होते. होरास वेल्स नामक दंतवैद्याने नायट्रस ऑक्साइड नावचे भूलेचे औषध वापरून दात काढण्याची शस्त्रक्रिया केली होती. परंतु त्यावेळेस तो रुग्ण शस्त्रक्रिये दरम्यान ओरडल्यामुळे तो प्रयत्न फसला होता. कदाचित औषधाचा डोस कमी पडला असावा. त्यामुळे हे सगळे खोटे आहे, थोतांड आहे अस सगळीकडे पसरले आणि त्या होरास वेल्सची प्रचंड बदनामी झाली. त्याला देश सोडून पळून जावे लागले.
पण मॅार्टन हा त्याचा सहकारी होता व असे काही भूलेचे औषध वापरून वेदनारहित शस्त्रक्रिया करता येतात हे त्याला माहित होते. त्यानंतर काही वर्षातच त्याने इथर डोम मध्ये यशस्वीरित्या इथर या औषधाचा वापर करून दाखवला.
इथर औषधाचा शोध:
तर अशा प्रकारे इथर या औषधाचा शोध लागला त्यापुढील जवळजवळ शंभर वर्ष इथर व क्लोरोफॉर्म ही औषधे भूल देण्यासाठी वापरले जात होते. अतिशय उत्तम वेदना शामक अशी ही औषधे होती. परंतु त्याचे काही दुष्परिणाम होते जसे की खूप मळमळ व उलट्या होणे, रुग्ण खूपवेळ झोपून राहणे. नंतर नवीन औषधांचा शोध लागला ज्यांची सुरक्षितता जास्त व दुष्परिणाम कमी होते. त्यामुळे आज आधुनिक भूलशासत्रात अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरलेली बघावयास मिळतात.
आता तर आपण फक्त कमरेखाली किंवा एका हाताला किंवा पायालाही भूल देऊन बधीर करू शकतो. यात रुग्ण जागा असतो. यासाठी लोकल अॅनेस्थेटिक औषधे वापरली जातात.
लोकाल अनेस्थेसिया ची सुरुवात:
या प्रकारच्या भूलेची सुरवात कशी झाली हा इतिहास पण मोठा गमतीदार आहे. इ .स. १८९९ मध्ये ऑगस्ट बायर नावाच्या शास्त्रज्ञाने त्याच्या काही रुग्णांना कोकेन नावचे औषध मणक्यामध्ये किंवा मज्जारज्जू मध्ये दिले आणि त्यामुळे दोन्ही पाय बधीर होतात हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ते औषध स्वतः च्या पाठीत आपल्या असिस्टंट कडून देवून घेतले आणि या औषधाचा काय परिणाम होतो ते अभ्यासले. असे हे खूप धाडसी व संशोक वृत्ती चे लोक असल्यामुळेच आधुनिक भूलशास्त्राचा उदय झाला.
फक्त एका हाताला किंवा पायाला दिली जाणारी भूल ज्याला आपण पेरिफेरल नर्व्ह ब्लॉक म्हणतो या मध्ये हाताच्या किंवा पायाच्या संवेदनांच्या नसांजवळ भूले चे औषध दिले जाते, जेणेकरून फक्त हात किंवा पाय बधीर होतो. या प्रकारची भूल ही अतिशय सुरक्षित असते. ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर, हृदय विकार , किडनी किंवा इतर आजार असतील त्यांना या प्रकारची भूल हे एक वरदानच आहे. पूर्वी या नसांजवळ अंदाजाने किंवा ठोकताळ्याने भूलेचे औषध देत असत. परंतु आता नर्व्ह स्टीम्युलेटर व सोनोग्राफी या उपकरणांमुळे अतिशय अचूक नसेजवळ व कमीतकमी औषधात भूल देता येते.
असा आहे हा भूलशास्त्राचा गेल्या दीडशे वर्ष्यातील रंजक प्रवास! चला तर मग साजरा करूया १६ ऑक्टोबर रोजी जागतिक भूलशास्त्र दिवस. या दिवशी ऋण व्यक्त करूया त्या प्रयोगशील व धाडसी शास्त्रज्ञांचे ज्यांनी प्रसंगी स्वतः चा जीव व सर्वस्व पणाला लावून या भूलशास्त्राचा पाया रचला आहे.
डॉ. अनिता नेहेते, भूलतज्ञ
संचालिका- वेदांत हॉस्पिटल प्रा.लि