14 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी वर्ष 1902 मध्ये भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सी बी . दत्ताराम अँड कंपनी ची सुरुवात मुंबईमध्ये झाली होती.
जाहिरात ही पासष्टावी कला आहे. जाहिरात म्हणजे इंग्रजी मध्ये Advertising . Advertising हा शब्द मूळ latin शब्द Adverto पासून घेतला गेला आहे. Adverto means – ‘ To Turn Around ‘. अत्यंत पुरातन अशा या कलेमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले. जसे तंत्रज्ञान, उत्पादने, सेवा व ग्राहकांची आवडनिवड बदलली त्याचेच प्रतिबिंब हे जाहिरातीमध्ये स्पष्ट दिसूू लागले.
भारतामध्ये इ. स पूर्व 4000 मध्ये जाहिरात केल्याचा उल्लेख
ओरडून आपल्या उत्पादनांची माहिती सांगणे यापासून हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ब्राँझ, मेटल ,दगड असे विविध साहित्य वापरून जाहिरात करण्यात येत असे. इजिप्तमध्ये पुरातन काळात जाड कागद वापरून हाताने तर अरब देशात तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिका या देशात भिंती किंवा दगड रंगवून जाहिरात होत असे प्रमुख्याने हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी जाहिरात त्याकाळी करण्यात येत असे. भारतामध्ये देखील इसवी सन पूर्व 4000 मध्ये पाषाण वापरून जाहिरात केल्याचा उल्लेख आढळतो.
1869 मध्ये जगातील पहिली पूर्ण जाहिरात एजन्सी एन. डब्लू.आयेर अँड सन्स ची स्थापना
एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्लंडमधील साप्ताहिकात जाहिरातीची सुरुवात झाली तर जून 1836 मध्ये एका फ्रेंच दैनिकात अधिकृतरित्या पैसे घेऊन जाहिरात छापण्यात आली. जसजसे जाहिरातीचे तसेच त्यामधील विविधता याचे महत्त्व वाढले तसे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांची गरज भासू लागली. 1840 च्या सुमारास फिलाडेल्फिया मध्ये व्होलनी पामर याने जाहिरात एजन्सी चे मूळ रोवले असे म्हणायला हरकत त्याने वेगवेगळ्या दैनिकातील स्पेस थोड्या किमतीत विकत घेतली व ती वेगवेगळ्या जाहिरातदारांना विकली. म्हणजे थोडक्यात पामर याने फक्त एका एजंट चे काम केले.
त्याकाळात जाहिरातीचे कॉपी, डिझाईन व लेआऊट हे जाहिरातदाराला स्वतः करावे लागत असे . पण जाहिरातीची स्पेस विकण्या सोबतच जाहिरातीचे कॉपी, डिझाईन व ले आऊट जर एकाच ठिकाणी मिळाले तर बरे होईल या या संकल्पनेतून 1869 मध्ये जगातील पहिली पूर्ण जाहिरात एजन्सी एन. डब्लू.आयेर अँड सन्स ची स्थापना झाली. यानंतर या क्षेत्राला एक व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर या क्षेत्राने पुन्हा मागे वळून कधीच बघितले नाही.
परदेशात 1920 च्या सुमारास रेडिओ स्टेशनचा व 1940 ते 1950 यादरम्यान दूरचित्रवाणीचा उगम झाला. त्यावरील कार्यक्रमांना प्रायोजक मिळू लागले. या माध्यमांमुळे जाहिरात क्षेत्राला एक नवी उभारी मिळाली
भारतात पहिली छापील जाहिरात बेंगाल गॅझेट या साप्ताहिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर टाटा पब्लिसिटी नोर्विकसंन ॲडव्हर्टायझिंग , ओअँड एम , युनिव्हर्सल पब्लिसटी अशा अनेक नामांकित जाहिरात एजन्सीने देशात आपले काम सुरु केले.
- 1941 मध्ये अभिनेत्री लीला चिटणीस हिने लक्स साबणाला ग्लॅमर प्राप्त करून दिले.
- 1957 मध्ये रेडीओ सिलोन चा जन्म झाला.
- 1967 मध्ये विविध भारती वर पहिली जाहिरात करण्यात आली.
- दूरदर्शन वर 1978 मध्ये पहिल्यांदा जाहिरात दिसली.
- 1982 मध्ये भारतात रंगीत टेलिव्हिजन ची सुरुवात झाल्यानंतर जाहिरातीच्या क्षेत्रात अनेक नव्या प्रकारे संधी निर्माण झाल्या.
- 1991 मध्ये झी टीव्ही ची सुरुवात झाली होती.
- 1992 मध्ये तत्कालीन सरकारने आपल्या आर्थिक धोरणात बदल केल्यानंतर विदेशी चॅनेल्स देखील भारतात दिसण्याची सुरुवात झाली.
या धोरणामुळे अनेक विदेशी कंपन्यांनी आपले विक्री जाळे भारतात विस्तारण्याची सुरुवात केली. त्यानंतर देशामध्ये एफ एम रेडिओ ला देखील मान्यता मिळाली त्यामुळे आकाशवाणी सोबतच विविध कार्यक्रम रसिकांना ऐकता येणे शक्य झाले.
जाहिरातीचे विस्तीर्ण विश्व
जशी जशी तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली त्याचे प्रतिबिंब हे जाहिरात क्षेत्रावर दिसत होते. आपली उत्पादने व सेवा ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी प्रिंट, टेलिव्हिजन ,रेडिओ, आउटडोअर अशा विविध माध्यमांसह इंटरनेट च्या उदयामुळे जाहिरातींचे एक नवे माध्यम सुरू झाले .त्यानंतर आलेल्या सोशल मीडियामुळे जाहिरातीचे विश्व अजूनच विस्तीर्ण झाले.
आर्थिक उलाढाल तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार
आजमीतिला जाहिरात उद्योग हा मोठ्या आर्थिक उलाढाल तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देणारे क्षेत्र असून सुमारे 876 बिलियन एवढा व्यवसाय या उद्योगात होत आहे. सामाजिक ,व्यवसायिक, राजकीय, शिक्षण,आरोग्य,शासकीय अशा अनेक क्षेत्रांना आपले उत्पादन, सेवा व विचार जनमानसापर्यंत पोचण्यासाठी जाहिरातींची गरज पडते.
यशामध्ये जाहिरात एजेन्सीचे मोलाचा वाटा
अनेक प्रकारची माध्यमे अस्तित्वात असल्याने योग्य प्रकारे जाहिरात करण्यासाठी जाहिरात एजन्सीची गरज पडते. एजन्सी मध्ये जाहिरात क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यवसायिक कार्य करत असतात. जाहिरात कशी करावी? कोठे करावी ?केव्हा करावी ?कशाप्रकारे करावी? याचे योग्य व शास्त्रोक्त मार्गदर्शन जाहिरात एजन्सी मार्फत करण्यात येते. आज देशात असणारे सर्व सफल उद्योग आणि सेवा यांचे जाहिरातीचे एक बजेट ठरलेले असते व त्यांना या सर्व गोष्टींची तंत्रशुद्ध माहिती देणारा सल्लागार म्हणजेच त्यांची ची जाहिरात एजन्सी.
जोपर्यंत उत्पादने आणि सेवा व ग्राहक आहेत तोपर्यंत जाहिरात उद्योग बहरणार हे नक्की.
अभिजीत चांदे, माध्यम व जनसंपर्क तज्ञ
9822753226 |abhichande@gmail.com