भारताची संस्कृती हि आपली वैश्विक ओळख असून भविष्यातील भारत घडविण्यासाठी सुदृढ व संस्कारी पिढी घडविणे आवश्यक असून ही पिढी घडविण्यामध्ये बालरोग तज्ञांची भूमिका मोलाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. त्या इंडियन अकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक या बालरोगतज्ञांच्या संघटनेच्या महिला विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी मंचावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्स वूमन विंग च्या अध्यक्षा डॉ. हिमाबिंदू सिंग, संयोजन समितीच्या सचिव व समन्वयक डॉ. संगीता लोढा (बाफना), इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार, वूमन्स विंगच्या संस्थापक अध्यक्षा डॉ स्वाती भावे, डॉ एलिझाबेथ व डॉ उपेंद्र किंजवडेकर हे मान्यवर उपस्थित होते.
महिलांमध्ये गुणवत्ता असून देखील त्यांना समाजात म्हणाव्या तेवढ्या संधी मिळत नाहीत. त्यामुळेच केंद्र सरकारच्या पुढाकाराने महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. महिला सक्षमीकरण तसेच मुलीच्या शिक्षणासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करत असून मुलगी शिकली तर संपूर्ण परिवार सक्षम होतो असेही त्यांनी नमूद केले. महिला बालरोग तज्ञांनी सुद्धा सरकारच्या या प्रयत्नात साथ द्यावी असे आवाहन करतांना बालरोग तज्ञांनी शरीराच्या आरोग्यासोबतच सामाजिक आरोग्यामध्ये देखील सकारात्मक भूमिका बजावावी असे आवाहन केले.
डॉ भारती पवार
कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या स्वागतपर भाषणात कुलगुरू डॉ माधुरी कानेटकर म्हणाल्या की, नाशिक ही शिक्षण आणि धर्म यांची भूमी आहे. या परिषदेत देशभरातून २०० हून अधिक महिला बालरोगतज्ञ सहभागी झाले असून या परिषदेमध्ये होणाऱ्या विविध तज्ञाचे मार्गदर्शन, पेपर प्रेझेंटेशनमुळे ज्ञानाचे आदान प्रदान होऊन ज्ञानरूपी समृद्धी मिळवण्यास मदत होईल. आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विविध स्तरावर कार्य करत असून यामध्ये संशोधन, सामाजिक जागृती तसेच समाजातील विविध घटकांसाठी कार्य प्रमुख असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या परिषदेतील विचारमंथनानंतर एक कृती आराखडा सादर करण्यात येणार असून युनिसेफ सोबत गर्ल्स चाईल्ड, स्तनपान, कुमार मुले व मुली यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येईल.
डॉ. हिमाबिंदू सिंग – महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष
या परिषदेच्या समन्वयक डॉ संगीता लोढा – बाफना यांच्या मते, या परिषदेच्या नाशिकमधील यशस्वी आयोजनाने आरोग्य क्षेत्रात नाशिकचे नाव पुन्हा एकदा अधोरेखीत झाले असून जन्म झाल्यानंतर पहिले एक हजार दिवस हे बालकासाठी महत्वाचे असतात. या दिवसांमध्ये बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. नाशिकच्या बालरोग संघटने तर्फे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या दोन दिवसीय परिषदेमध्ये विविध विषय जसे ह्युमन मिल्क बँक, लहान मुलांचा संतुलित आहार, लसीकरण, मुलींच्या आरोग्याचे सबलीकरण, मासिक पाळी व आरोग्य, मुलगा-मुलगी समानता, कोविड नंतरचे आरोग्य अशा अनेक विषयांवर विचारमंथन होईल. तसेच वॉकेथॉन व हास्य योगाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेसाठी केंद्रीय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्त डॉ सुमिता घोष, युनिसेफ चे भारतातील प्रतिनिधी डॉ विवेक सिंग, डॉ सेबंती घोष, डॉ हेमंत गंगोलीया, डॉ अमोल पवार, डॉ रमाकांत पाटील, डॉ केदार मालवतकर तसेच देशभरातून बालरोगतज्ञ उपस्थित आहेत.