फायर अँड सिक्युरिटी या क्षेत्रात जनजागृतीचे काम करणारी देशातील सर्वात मोठी संस्था ‘फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ (एफएसएआय) च्या नाशिक शाखेचा शुभारंभ आणि पदग्रहण सोहोळा येत्या 6 ऑगस्ट रोजी होत असून या निमित्ताने ‘सुरक्षित नाशिक’ या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाशिक शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरूण तिवारी व सचिव हर्षल भामरे यांनी दिली.
सुरक्षित नाशिक या चर्चासत्रामध्ये तीन विविध विषय असून यामध्ये औद्योगिक अग्नी सुरक्षा, महिला सुरक्षा तसेच शहर सुरक्षा हे प्रमुख आहेत.
या चर्चासत्रासाठी नामवंत व अनुभवी वक्त्यांना आमंत्रित करण्यात आले असून औद्योगिक सुरक्षा या विषयासाठी मिलिंद ओगले, अंजली आडे तसेच महिंद्रा आणि एबीबी चे प्रतिनिधी असतील. महिला सुरक्षा या विषयासाठी पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, डॉ. चेतना दहिवलकर, आर्कि. अर्चना पेखळे व आर जे वैष्णवी यांचा समावेश आहे.
शहर सुरक्षा या विषयावरील चर्चासत्रात उपजिल्हाधिकारी उदय किसवे, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य उपसंचालक कन्हैया झोपे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले व अनिल शिंदे हे सहभाग घेतील.
यानंतर होणाऱ्या पदग्रहण समारंभासाठी देशातील अनेक नामवंत नाशिक मध्ये येणार असून यामध्ये एफएसएआय चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित राघवन, पश्चिम विभागीय संचालक निमित शेठ हे प्रमुख आहेत.
पदग्रह सोहळ्या दरम्यान एफएसएआयच्या नाशिकमधील स्टुडन्ट चॅप्टरचा देखील शुभारंभ होणार आहे.
सदर कार्यक्रम सुला विनियार्डस येथे होणार असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद दीक्षित, संजीव जगताप , किरण चव्हाण , नॉर्बिर्ड डिसूजा तसेच सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.