मार्च महिन्यापासूनच नाशिककरांना उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून त्याची तीव्रता ही एप्रिल आणि मे या महिन्यात वाढतच जाइल.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे,अशक्तपणा वाढणे,काम कमी केले तरी जास्त दमायला होणे तसेच घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर टाकली जाणे ह्या बाबींची देखील सुरुवात होते. तापमान बदल व वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेतली नाही तर उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो असे प्रतिपादन सह्याद्रि हॉस्पिटल्स चे फिजिशियन डॉ अभिषेक पिंप्राळेकर यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की उन्हाळ्यामुळे उद्भवणार्या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि हीट स्ट्रोक यांचा समावेश असतो.याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवतात.जशी उष्णता वाढते तशी पचनक्रिया मंदावू शकते.त्याशिवाय वारंवार बाहेरचे खाणे हा शहरी जीवनशैलीमधील एक नियमित भाग झाला आहे.त्यात उघड्यावरील किंवा अस्वच्छ अन्न,द्रवपदार्थ खाण्या-पिण्यात आले की पचनाशी संबंधित आजार उद्भवतात.विशेेष करून अतिसार.त्याचे कारण असे की,अस्वच्छ किंवा दूषित अन्नावर विषाणू,जीवाणू हे जास्त वेळ टिकून राहतात.यामुळे सर्व वयोगटातील लोकांवर याचा प्रभाव पडू शकतो.विशेष करून पाच वर्षांखालील बालके आणि साठ वर्षावरील लोकांमध्ये याचा जास्त परिणाम जाणवतो.शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर ते पुन्हा पुर्ववत आणण्याची क्षमता या वयोगटातील लोकांमध्ये कमी असल्याने परिणाम जास्त दिसून येतात.
यावर उपाय म्हणजे सर्वांनी दोन पध्दतीने आपली काळजी घेतली पाहिजे.पहिले म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन देऊ नका आणि दुसरे म्हणजे विनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नका.कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर छत्री,टोपी,हेल्मेट हे उन्हाळ्यातील सुरक्षा कवचांसारखे आहे.या सुरक्षा कवचामधील सर्वांत महत्त्त्वाचा घटक म्हणजे आपल्या घरातील स्वच्छ पाणी.बाहेर जाताना स्वत:ची पाण्याची बाटली घेऊन निघावे.त्याचबरोबर सैलसर,सुती व फिकट रंगांचे कपडे उन्हाळ्यात शक्यतो घालावेत.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याला डीहायड्रेशन म्हणतात,जेव्हा शरीरातून द्रवपदार्थ जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा ही स्थिती उद्भवते.ही स्थिती उन्हाळ्यात सामान्य असते कारण, आपल्या शरीरातून घामावाटे किंवा लघवीवाटे पाणी बाहेर जात असते आणि तेवढ्या प्रमाणात पाणी शरीरात गेले नाही तर तहान वाढते.
शहरी जीवनशैलीमध्ये समस्या वाढविणारा भाग म्हणजे वारंवार बाहेरचे व तेलकट,मसालेदार अन्न खाणे.धकाधकीच्या आणि गतिशील जीवनशैलीमध्ये घरातून डबा आणण्याचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे.परिणामी रस्त्यावरील उघडे अन्न खाल्ल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.प्रत्येकालाच चटकदार पदार्थ खायला आवडतात परंतु किमान उन्हाळ्यात तरी थोडी सावधगिरी बाळगावी.महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये आपण घरचेच अन्न खात होतो.हीच सवय पुढे सुरू ठेवायला काय हरकत आहे.ज्या व्यावसायिकांना मीटिंग्सना किंवा कुठल्या कामानिमित्त बाहेर पडावे लागते त्यांनी लांबचा प्रवास करताना मध्ये विश्रांती घेऊन पाणी पित राहावे,जेणे करून पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.शहरातील अनेक कार्यालये आता वातानुकुलित आहेत,पण बाहेरच्या तीव्र तापमानामधून लगेचच कार्यालयात जाऊन वातानुकुलित यंत्रणा चालू करू नये.थोडा वेळ जाऊन द्यावा आणि मग चालू करा.मोठ्या कार्यालयांमध्ये जेथे वातानुकुलित यंत्रणा सेंट्रलाईज्ड असते तिथे आत जाण्याआधी काही मिनिटे सावलीत थांबून मग आत जावे.ऑफिसमधून बाहेर पडताना देखील तेच करावे.शरीरातील पाण्याचे प्रमाण चांगले ठेवल्यास उन्हाळ्यातील अनेक समस्यांपासून आपण दूर राहू शकतो.नारळाचे पाणी,साखर व बर्फविरहीत फळांचे रस घ्यायला हरकत नाही.परंतु फळांचा रस घेताना तेथील स्वच्छतेची खात्री करून घ्यावी.कार्बोनेटेड पेय टाळा.
उन्हाळ्यातील आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे हीटस्ट्रोक. हीटस्ट्रोकची समस्या आपल्याकडे तुलनेने कमी असली तरी तीव्र उष्णता असलेल्या भागात हे जास्त आढळून येते.मात्र आता तापमान आपल्या येथे 40 अंशाच्या वर जाऊ लागले आहे आणि म्हणून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.उन्हाच्या संपर्कामुळे शरीरातील तापमान वाढल्यामुळे ही अवस्था उद्भवू शकते.याच्या आपल्या येथे आढळणार्या प्रमुख लक्षणांमध्ये डोकेदुखी,चक्कर येणे,नाकातून रक्त येणे,पोटात किंवा पायात गोळा येणे,तीव्र परिणाम झाल्यास व्यक्ती बेशुध्द पडू शकतो.अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास शरीरातील पाण्याच्या प्रमाणावर कटाक्षाने लक्ष ठेवावे.पाणी पीत राहावे.गरज नसल्यास उन्हात बाहेर पडू नये.सामान्य नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी तीव्र उष्णतेत शक्यतो दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाण्यास टाळावे.तुमच्या बैठका किंवा नियोजित कार्यक्रम त्याच्या आधी किंवा नंतर देखील करता येऊ शकतात.
उन्हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्त खाणे ह्या दोन्ही गोष्टी टाळाव्यात आणि विशेषत: रात्रीच्या जेवणात हलक्या आहाराचा समावेश असावा. तीव्र उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण घटते म्हणून दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे असते.
उन्हाळ्याचे संपूर्ण 4 महिने योग्य आहार घेणे हे उन्हाच्या त्रासापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. योग्य काळजी घेतल्यास उन्हाळा सुखकर होण्यास नक्कीच मदत होईल.