बांधकामादरम्यान एक दुस-याच्या सहकार्याने काम कारणा-या विविध संघटना येत्या २६ फेब्रुवारी रोजी एक दुस-या विरुद्ध मैदानात झुंजणार आहेत. निमित्त आहे ते एका क्रिकेट स्पर्धेचे. अग्नी सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
फायर व सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाच्या ( एफएसएआय ) नाशिक शाखेद्वारे येत्या २६ फेब्रुवारी रोजी आमंत्रितांच्या बॉक्स क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हील इंजिनीअर्स, फायर अॅण्ड सिक्युरिटी असो. ऑफ इंडिया, नाशिक महानगर पालिका अग्निशमन विभाग, महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळ, क्रेडाई, आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असो., इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, चार्टड अकौंटंट व महाराष्ट्र फायर सर्व्हीसेस यांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती नाशिक फायर अॅण्ड सिक्युरिटी असोसिएशनचे सहसचिव वरूण त्रिवारी, आनंद दिक्षित व हर्षद भामरे यांनी दिली.
२६ फेब्रुवारी रोजी गंगापूर रोड वरील स्पोर्टस कल्चर क्लब येथे सकाळी ७.३० वा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक किरण चव्हाण व महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजय गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी ७ वाजता स्पर्धेचे पारितोषक वितरण समारंभ होणार असून याप्रसंगी आर जे सतरंगी रुचा, अल्ट्राटेक सिमेंटचे व्यवस्थापक सुनील मिसाळ व अभिनेत्री सई मोने पाटील या उपस्थित राहणार आहे. विजेत्या संघास आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दिपक दांडगावकर, मनोज कर्डिले, संजय जगताप, गजेंद्र जगताप आदी सक्रीय आहेत.