पावसाळा सुरू झाला की कोरड्या,दमट आणि ओलसर वातावरणामुळे सर्दी,ताप, बुरशीजन्य,त्वचा संदर्भात आजार सामान्यपणे आढळून येतात. तसेच दूषित पाण्यामुळे पोटाशी निगडीत असलेल्या समस्या देखील निर्माण होऊन विविध आजारांना सामोरे जावे लागते. गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये मलेरिया,डेंग्यू, चिकनगुनिया यांचा समावेश असतो. त्यामुळे पावसाळ्यातील आजार हे नेहमीच आपल्यासाठी चिंतेचा विषय राहिला आहे.
पण महामारीमध्ये या चिंतेत भर पडली आहे.ताप आला तर हा पावसाळ्यातील सर्वसामान्यपणे आढळणारा ताप आहे का,कोविड संसर्ग आहे अशा अनेक शंका लोकांमध्ये निर्माण होत असतात.याचे कारण यातील बरीचशी लक्षणे ही कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये देखील दिसून येतात.
लक्षणे
या सर्व गोष्टी लक्षात घेता महामारीच्या काळातील पावसाळ्यात जर आपल्याला ताप किंवा कणकण जाणवणे,थंडी वाजणे,खोकला,थकवा,घसा सूजणे,नाक गळणे,अंग दुखणे अशा तापांशी निगडीत लक्षणे आढळून आली तर डॉक्टरांशी संपर्क साधा.अशी लक्षणे असणारी व्यक्ती नुकतेच कोविड संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आली असल्यास हे गांभीर्याने घेण्याचीगरज आहे.
इन्फ्लूएन्झा ह्या प्रकारचा संसर्ग पावसाळ्यात सर्वसामान्यप्रमाणे आढळून येते,याला आपण फ्ल्यू असे म्हणतो. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य आहे. याचा प्रभाव श्वसन प्रणाली,नाक,घसा आणि आपल्या फुफ्फुसांवर देखील होतो. नाक वाहणे,डोकेदुखी,डोळ्यातून पाणी येणे,शरीराला वेदना होणे,थकवा,ताप आणि घशात जळजळ होणे ही लक्षणे दिसून येतात. विशेष करून लहान मुलांचा यापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक इन्फ्लूएन्झाची लस दिल्यास किमान या संसर्गापासून आपण बचाव करू शकतो.
पावसाळ्यात खराब खाद्यपदार्थ व दूषित पाण्यामुळे पसरणारा गंभीर जीवाणूजन्य आजार म्हणजे कॉलरा. कॉलरामुळे व्यक्तीला तीव्र अतिसार,उलट्या झाल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते व स्नायूंमध्ये गोळे येऊ शकतात.
दूषित अन्न व पाण्यामुळे उद्भवणारा टायफॉईड हा साल्मोनेला टायफी या जिवाणूंमुळे होणारा संसर्ग असून यामध्ये ताप,डोके दुखी,अतिसार,पोटदुखी अशी लक्षणे दिसतात.
पावसाळ्यात डासांमुळे होणार्या आजारांमध्ये डेंग्यू व मलेरियाचा समावेश आहे.स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती तर, अस्वच्छ पाण्यात मलेरियाच्या विशिष्ट जातीच्या डासांची पैदास होते.या आजारांमध्ये देखील ताप,डोकेदुखी,श्वसनाचा त्रास अशी लक्षणे दिसून येतात.
अनेक लक्षणे ही विविध कारणांमुळे होणार्या तापांसाठी सारखीच असली तरी तात्पुरती चव जाणे,वास न येणे हे कोविड-19 संसर्गामध्येच पाहायला मिळते.काही वेळा कोविड-19 संसर्गाबरोबर रूग्णांना इतरही संसर्ग त्याच वेळेस होऊ शकतात.उदा.सामान्य फ्ल्यू,डेंग्यू इ.म्हणूनच महामारीच्या काळात येणार्या पावसाळ्यामध्ये स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
ही घ्या काळजी
उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय करणे नेहमीच चांगले असते.
- पावसाळ्यात वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित करावे.
- घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावे, विशेष करून पाय धुवून पूर्ण वाळवावे जेणे करून पावसाळ्यातील बुरशीजन्य आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
- सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पिणे
- स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या व फळे स्वच्छ पाण्याने धुणे
- स्वतंत्र टॉवेल वापरणे
- बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नये,ताजे शिजवलेले अन्न खाणे.
- स्वच्छ आणि कोरडे कपडे वापरणे गरजेचे आहे.
- महामारीच्या काळात गर्दीच्य ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श करणे टाळा,जर स्पर्श केला तर साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.
- इतर ऋतूप्रमाणेच पावसाळ्यातही भरपूर पाणी प्यावे.विशेेष करून या हवामानात पाणी उकळून ठेवावे किंवा शक्य असल्यास फिल्टर्ड पाणी प्यावे.
- क जीवनसत्त्व असलेल्या घटकांचा आहारात समावेश करा.
- निरोगी व संतुलित आहाराचे सेवन करा.
पावसाळ्यात डासांना दूर ठेवण्यासाठी सर्व उपाय
- पाणी जास्त दिवस साठवून न ठेवणे,
- घराच्या परिसरात स्वच्छता ठेवणे हे महत्वाचे ठरते.
- डासांच्या दंशापासून वाचण्यासाठी पावसाळ्यात बाहेर पडताना शक्यतो पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे.
- घरातील फ्लॅावर पॉटमधील पाणी दर एक दोन दिवसांनी बदला.
डॉ . अभिषेक पिंप्रालेकर [सहयाद्री हॉस्पिटल , नाशिक]