विवाहबाह्य संबंधां चे वाढते प्रमाण… समुपदेशनाने निघू शकतो मार्ग..

Advertisements

सामाजिक समुपदेशन बद्दल प्रास्तविक माहिती आणि त्याचे सकारात्मक परिणाम याबाबत आपण मागील लेखात चर्चा केली.. 
या दुसऱ्या   लेखात समाजात कोणाकोणाला समुपदेशन आणि कायदेशीर मार्गदर्शन मुळे फरक पडतोय, निर्णय घेणे सोपे होते आहे यावर प्रकाशझोत टाकणार आहोत. 


वैवाहिक समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन करून फक्त पती पत्नी मधील नातेसंबंध च्या समस्या सोडविणे या पलीकडेही समाजातील अनेक स्त्री, पुरुष, युवक, युवती, विध्यार्थी, जेष्ठ नागरिक, रुग्ण यांना देखील आपण प्रबोधन करून त्याच्याशी संवाद साधतं आहोत. अनेकदा वैवाहिक नातेसंबंध पलीकडे जाऊन स्त्री पुरुष यांचे मध्ये भावनिक, शारीरिक जवळीक निर्माण होते आणि त्याचे रूपांतर एका अश्या नात्यात होते ज्याला समाज अनैतिकता, विवाहबाह्य अनैतिक संबंध असे नाव देतोय.
आज आपण अश्या संबंधांमधून मधून त्रास होत असलेल्या स्त्री पुरुष यांच्या आयुष्याला योग्य वळण कसे देऊ शकतो आणि झालेली चूक सुधारली कशी जाऊ शकते याबाबत थोडक्यात जाणून घेत आहोत.


आपापल्या वैवाहिक जोडीदाराकडून ज्या मानसिक भावनिक शारीरिक अपेक्षा आपल्या पूर्ण होत नाही त्याला पूर्ण करण्यासाठी,मानसिक आधार मिळविण्यासाठी अनेक जण या प्रकारच्या रीलशनशिप स्वीकारतात. परंतु जेव्हा अश्या संबंध मधून देखील पुढे जाऊन आपल्याला शारीरिक, भावनिक, आर्थिक त्रास होऊ लागतो, आपल्यावर अन्याय होतो आहे, आपला गैरवापर केला जातो आहे, अथवा आपल्याला गृहीत धरले जात आहे असे संबंधित पुरुषाला अथवा महिलेला वाटायला लागते,  तेव्हा  यातून बाहेर पडणे, किंवा ते रिलेशन अधिक विश्वासाने, सामंजस्याने पुढे नेणे यासाठी समुपदेशन ची मदत घेतली जाते.

अनेकदा असे संबंध हें समाजापासून, कुटुंबापासून लपलेले असतात त्यामुळे यावर दाद मागायला कुठे जायचं, कायद्याचा आधार कसा घ्यायचा हा प्रश्न संबंधितांना पडतो.अनेक जन अश्या प्रकारच्या रेलशनशिप मुळे मोठया प्रमाणात मानसिक तणाव घेतात, समोर निर्माण झालेली परिस्तिथी हाताळता नं आल्यामुळे घातपात, आत्महत्या यासारखे मार्ग स्वीकारतात. अश्या प्रकारच्या नातेसंबंध मध्ये कोण चूक कोण बरोबर, असे का घडले, कोण वाईट, कोणी कोणाला फसवलं त्यांचे चरित्र यावर जास्त चर्चा होताना दिसते. यामध्ये सगळ्यात जास्त मानसिक त्रास होतो तो महिलांना, कुटुंबियांना आणि अपत्यांना. परंतु या गोष्टी वर चर्चा करून याची बदनामी करण्यापेक्षा, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जर या प्रकरणातील व्यक्तींचे समुपदेशन केलें गेले, त्यांना योग्य दिशा दाखवली गेली, त्यांना आयुष्यात सावरायला संधी दिली तर नक्कीच खूप फरक पडतो हा अनुभव सातत्याने येतो आहे.


आपल्याकडे अश्या अनेक केस येतात ज्याच्या बाबतीत हें घडत आहे. एकमेकांना ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे यासारखे प्रकार अश्या नातेसंबंधात बघायला मिळतात. अश्या वेळी या प्रकरणांमध्ये झालेला भावनिक गुंता, त्याचे होत असलेले खच्चीकरण, वास्तव परिस्तिथी आणि भविष्यातील संभाव्य त्रास, त्या व्यक्तीची सामाजिक पत प्रतिष्टा, त्याचे कुटुंबीय या सर्व बाबीवर अभ्यास करून समुपदेशन केलें जाते. त्यामुळे विवाहित मंडळींमधील विवाहबाह्य संबंध आणि प्रेमप्रकरण या विषयावर देखील समुपदेशन मधून योग्य तो मार्ग काढता येतो.  या स्वरूपातील प्रकरण तसेच त्याची माहिती गोपनीय राहाते. येथे आपण एक वास्तव उदाहरणं पाहुयात. एक महिला आपल्या पतीपासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याचे पासून लांब राहायला लागली आणि पतीपासून असलेला छोटा मुलगा तिने तिच्या सोबत घेतला होता. मोठा मुलगा वडिलांसोबत राहत होता. पती पासून कायदेशीर फारकत झालेली नसताना ती विभक्त जीवन जगत असताना आणि उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना, मानसिक खच्चीकरण झालेले असताना तिला प्रेम आणि आधार आवश्यक वाटत होता.. 


सासर आणि माहेरच्या लोकांचा हवा तसा पाठिंबा नव्हता. त्यातच तिची भावनिक, शारीरिक जवळीक एका व्यक्ती सोबत झाली .ज्याचे लग्न झालेले असून त्यांना दोन अपत्य देखील होती. अनेक वर्ष त्या व्यक्तीने या महिलेसोबत आपल्या कुटुंबाला सांभाळत बाहेर संबंध प्रस्तापित ठेवले होते. या व्यक्तीचे त्याच्या पत्नी, मुल, नातेवाईक यांच्या सोबत सातत्याने वाद होत होते कारण त्यांना हें विवाहबाह्य संबंध मान्य   नव्हते. 

या महिलेला देखील सदर व्यक्ती ची पत्नी फोन करून धमक्या देणे, तिला मारहाण करणे असे प्रकार सातत्याने घडत होते. संबंधित महिलेचा फोन आला असता ती प्रचंड रडत होती आणि तिला या माणसाचे कुटुंब कश्या प्रकारे त्रास देते, मारहाण करते, ज्या व्यक्ती सोबत ती राहाते आहे ती व्यक्ती सध्या काहीही कमवत नाही उलट हिलाच मेहनत करून त्याला पोसावे लागत होते. त्याच्यापासून तिला एक छोटी मुलगी आहे .


कोणताही पर्याय नाही आता काय करावे कुठे जावे यावर ती बोलत होती. तिला स्वतः देखील सर्व गोष्टीचा पश्चाताप होतो आहे आणि आता तिच्या रिलशनशिप ला कोणत्याही कायद्याचा आधार नसल्यामुळे कुठे दाद मागू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रसंगी तिला समुपदेशन करून तिच्या पतीला सासरच्या लोकांना विश्वासात घेऊन, ज्या व्यक्ती सोबत ती राहत होती त्यांना विश्वासात घेऊन तिला तिच्या हक्काच्या घरात परत जागा मिळून दिली गेली आणि जास्तीत जास्त सकारात्मक मार्ग काढण्यात यश आले. 
अश्या प्रसंगी संबंधित पीडितेची भावनिक मानसिक परिस्थिती समजून घेणे, संयमाने प्रकरण हाताळणे आणि त्यांना शाश्वत सत्य स्वीकारून आयुष्य जगण्याची उमेद देणे हें खूप महत्वाचे असते. आपले आयुष्य क्षणिक मोहासाठी भरकटू देऊ नये, आयुष्यात आधीच झालेला गुंता अजून वेगळ्या वाटेला जाऊन वाढवण्यापेक्षा वेळेत स्वतः ला सावरणे खूप महत्वाचे असते. या प्रकारच्या विवाह बाह्य संबंधातून वेळ, पैसा, प्रतिष्ठा, आपली मान मर्यादा, स्वतः चा संसार, मुल असल्यास त्यांचं भवितव्य, आपल्या भावना, आपलं करियर सगळं पणाला लागत . कालांतराने अश्या नात्यांमध्ये गैरसमज, कटुता, वाद वाढतात आणि प्रेमाचे रूपांतर पश्चातापात व्हायला वेळ लागत नाही, हें समुपदेशन च्या माध्यमातून अनेकांना सांगण्यात येतें आणि त्यांच्यात आमूलाग्र बदल होताना दिसतो. समाजातील अनेक घटक यात गुरफटलेले दिसतात यांना समुपदेशन मार्फत नक्कीच योग्य दिशा मिळते.

सौं. मीनाक्षी कृष्णाजी जगदाळे 9834114342, 9766863443.

One thought on “विवाहबाह्य संबंधां चे वाढते प्रमाण… समुपदेशनाने निघू शकतो मार्ग..

Leave a Reply

You cannot copy content of this page