राष्ट्रीय जाहिरात दिवसानिमित्त जाहिरात आणि माध्यमाच्या प्रवासाचा आढावा घेणारा लेख
मराठी मध्ये जाहिरात, हिंदी मध्ये विज्ञापन आणि इंग्रजीमध्ये ऍडव्हर्टायझिंग हा शब्द मूळ लॅटिन शब्द ॲडव्हर्टो यावरून घेतलेला आहे. आणि शब्दाचा इंग्रजी अनुवाद म्हणजे To Turn Around .
जाहिरात ही ६५वी कला आहे, असे म्हटले जाते. अत्यंत पुरातन अशा या कलेमध्ये अनेक बदल, स्थित्यंतरे होत आहेत. अगदी पुरातन काळामध्ये ओरडून आपल्या उत्पादनाची माहिती सांगण्यापासून ते आज आपल्या हाती असलेल्या मोबाईलमधील जाहिरातीपर्यंतचा प्रवास अत्यंत मनोरंजक आहे. पुरातन काळापासून बॉन्झ प्लेट, दगड असे साहित्य वापरून जाहिरात होत असे. इजिप्तमध्ये पुरातन काळात जाड कागद वापरून हाती जाहिरात करत असत. यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक संदेश असे. अरब देशात तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत भिंती किंवा दगड रंगवून जाहिरात करत असत. प्रामुख्याने हरवलेल्या व्यक्तीच्या शोधाकरिता बरेचदा ही जाहिरात असे. भारतामध्येही इसवी सन पूर्व ४००० मध्ये पाषाण वापरून जाहिरात केल्याचा उल्लेख आढळतो. चीनमध्येही कवितेच्या व गीतांच्या स्वरूपात जाहिरात करत असत. जसजशी तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली तसतशी जाहिरातींची माध्यमेही बदलत गेली.
14 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी वर्ष 1902 मध्ये भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सी बी . दत्ताराम अँड कंपनी ची सुरुवात मुंबईमध्ये झाली होती. १९व्या शतकात इंग्लंडमध्ये साप्ताहिकामध्ये जाहिरातीची सुरुवात झाली. प्रामुख्याने विविध पुस्तकांचा प्रचार करण्याकरिता या जाहिराती देत असत. यानंतर वाचकांच्या प्रकारांप्रमाणे जाहिराती साप्ताहिकात देण्याचे चलन झाले, जेणेकरून योग्य वाचकांपर्यंत उत्पादन सेवा याबाबतचा संदेश पोहोचविता येईल. जून १८३६ मध्ये एका फ्रेंच दैनिकात पैसे घेऊन अधिकृतरित्या जाहिरात छापण्यात आली. यानंतर जसजशी उत्पादनाची सेवेची लोकप्रियता व व्याप्ती वाढली तसेतसे हे काम करण्यासाठी व्यावसायिकांची गरज वाढली व त्यातूनच जाहिरात एजन्सी या संकल्पनेचा उगम झाला.
१८६९ मध्ये जगातील पहिली पूर्ण जाहिरात एजन्सी एन. डब्लू. आयेर अॅण्ड सन्स या जाहिरात एजन्सीची स्थापना करण्यात आली. भारतातील पहिल्या जाहिरात एजन्सीची सुरुवात झाल्या नंतर बरेच वर्ष फक्त नियतकालिके किंवा दैनिके यामध्ये जाहिराती होत होत्या. ऑलिव्ही अॅण्ड माथर व हिंदुस्तान थॉमसन असोसिएटसची सुरुवात भारतात १९२०मध्ये झाली. जसजसे माध्यमांमध्ये तांत्रिक बदल होत गेले तसतसे जाहिरातींचे स्वरूपही बदलत गेले. १९६७ मध्ये ‘विविध भारती’ या रेडिओवर पहिली जाहिरात, तर १९७८मध्ये दूरदर्शनवर पहिल्यांदा जाहिरात केली गेली. यानंतर १९८२मध्ये भारतात रंगीत टेलिव्हिजनची सुरुवात झाल्यानंतर टीव्हीवरील जाहिराती, प्रायोजित कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
- 1941 मध्ये अभिनेत्री लीला चिटणीस हिने लक्स साबणाला ग्लॅमर प्राप्त करून दिले.
- 1957 मध्ये रेडीओ सिलोन चा जन्म झाला.
- 1967 मध्ये विविध भारती वर पहिली जाहिरात
- दूरदर्शन वर 1978 मध्ये पहिल्यांदा जाहिरात दिसली.
- 1982 मध्ये भारतात रंगीत टेलिव्हिजन ची सुरुवात झाल्यानंतर जाहिरातीच्या क्षेत्रात अनेक नव्या प्रकारे संधी निर्माण झाल्या.
- 1991 मध्ये झी टीव्ही ची सुरुवात झाली
- 1992 मध्ये तत्कालीन सरकारने आपल्या आर्थिक धोरणात बदल केल्यानंतर विदेशी चॅनेल्स देखील भारतात दिसण्याची सुरुवात झाली.
- त्यानंतर देशामध्ये एफ एम रेडिओ ला देखील मान्यता मिळाली त्यामुळे आकाशवाणी सोबतच विविध कार्यक्रम रसिकांना ऐकता येणे शक्य झाले.
जाहिरात एजन्सी सोबत देशातील मीडियाचा प्रवास देखील बराच मनोरंजक आहे.
साधारणपणे मीडियाचे तीन टप्पे पाडले जाऊ शकतात यामध्ये पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ. या काळामध्ये प्रामुख्याने प्रिंट मीडिया प्रभावशाली होता. यामध्ये अनेक दैनिके, नियतकालिके, पाक्षिके आणि मासिके याचा प्रामुख्याने समावेश करता येईल. या प्रिंट मीडियाचा प्रामुख्याने उद्देश हा स्वातंत्र्याची चळवळ अधिकाधिक देशवासीयापर्यंत पोहोचवणे हा होता आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटेल की आपल्या स्वातंत्र्यलढ्यात मीडियाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
यानंतर आला तो दुसरा टप्पा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दैनिके यांनी आपले काम सुरूच ठेवले .या दैनिकांचे प्रामुख्याने कार्य म्हणजे देशाच्या उभारणीमध्ये सकारात्मक भूमिका निभावणे. परंतु याच काळात अनेक उद्योगपती घराण्यांनी दैनिकांचे मालकत्व आणि पालकत्व स्वीकारले. याचा उद्देश कदाचित स्वतःच्या प्रतिष्ठेमध्ये भर टाकणं आणि समाजामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणे असा असू शकेल. यावेळी देखील मीडियाकडे उत्पादन म्हणून बघितले जात नव्हते.
परंतु 90 च्या दशकात जसे आपण आपली बाजारपेठ खुली केली याचवेळी अनेक मीडिया ने या कडे व्यावसायिकता या नजरेने देखील बघणे सुरू केले आणि मग मीडिया चा प्रवास एका प्रॉडक्ट कडे सुरू झाला. या सर्व प्रवासात वाचक / दर्शक हा ग्राहक झाला. मार्केटिंग गुरु फिलिप कोटलर याने सांगितल्याप्रमाणे उत्पादनां साठी चार P महत्वपूर्ण आहेत . यामध्ये प्रॉडक्ट ,प्राईस, प्रमोशन आणि फिजिकल डिस्ट्रीब्यूशन हे ते आहेत आणि मीडियाने देखील आपल्यामध्ये ग्राहकांनुरूप बदल करणे सुरू केले आणि हे बदल निरंतर सुरू आहे. अर्थात याला थोडेफार अपवाद असतीलही. म्हणजेच थोडक्यात माध्यमांचा प्रवास हा इन्फॉर्मेशन ,एंटरटेनमेंट आणि इन्फोटेन्मेंट असा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये ..
प्रिंट, टेलिव्हिजन, रेडिओ, आऊटडोअर अशा विविध माध्यमांसोबत इंटरनेट चे जाळे वेगाने पसरल्यामुळे इंटरनेट हेदेखील जाहिरातीचे नवे माध्यम झाले. त्यानंतर आलेल्या सोशल मीडियामुळे जाहिरातींचे विश्व अजूनच विस्तीर्ण झाले आहे ..
जाहिरात ही आजही नव्या मार्गाने सुरू आहे .AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा देखील प्रभाव तंत्रज्ञान म्हणून जाहिरात क्षेत्रावर होणार आहे हे नक्की . आजमीतिला बातमी देणे आणि जाहिराती या सोबतच माध्यमांनी अनेक विविध रोल समाजात बजावले असून यामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील आधुनिकते सोबतच विविध इनोवेशन तसेच अनेक इव्हेंट्स, पुरस्कार ,अभ्यास दौरे ,शहराबद्दल चर्चा सत्र, परीक्षेबाबत मार्गदर्शन , महिला,युवक आणि बालकांसाठी उपक्रम असे नाविन्य पूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. व्यक्ती आणि संस्था यांची प्रतिमा घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य आज सर्वच माध्यमे करत आहेत .
एका व्यक्तीपासून अगदी ५०० हून अधिक जाहिरात व्यावसायिकांचा समावेश असलेली जाहिरात एजन्सी असो की अगदी कॅलिग्राफीच्या साहाय्याने हाताने रेखाटलेली जाहिरात किंवा ब्लॉकने तयार केलेली जाहिरात व आता आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केलेली जाहिरात ही स्थित्यंतरे गेल्या अनेक शतकांत होत गेली व आगामी काळातही होतीलच यात शंका नाही.
जोपर्यंत एका व्यक्तीपासून विचार, सेवा किंवा उत्पादनांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता राहील, तोपर्यंत जाहिरातीचे अस्तित्व व गरज राहणारच यात तीळमात्रही शंका नाही. या सर्व माध्यमांमध्ये आजमीतिला चे मनुष्यबळ कार्यरत आहे त्यांनी स्वतःला निरंतर अपडेट करणे आवश्यक आहे. भारतातील जाहिरातींचा व्यवसाय हा सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा असून तो 2025-26 मध्ये 1.64 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, आजही असंख्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार या क्षेत्रात असून येणाऱ्या काळातही रोजगार देणारे ‘जाहिरात’ हे मोठे क्षेत्र ठरणार आहे, यात शंका नाही.
- डॉ . अभिजीत चांदे
- माध्यम आणि जनसंपर्क तज्ञ
- ९८२२७५३२२६
- [ लेखक हे अंश मार्केटिंग कम्युनिकेशन चे संस्थापक आहेत ]
