आजची ग्लोबल वार्मिंग ची परिस्थिती खूप गंभीर आहे . सरासरी तापमान हे सुमारे ३ ते ४ डिग्री ने वाढले आहे . या साठी वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड हीच दोन महत्वाचे आहेत . पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी समाजातील विविध व्यक्ती व संस्था वेगवेगळी पावले उचलत असतात. आपण वापरत असलेला कागद हा वृक्ष तोडून बनविला जातो आणि याच कागदाचा वापर कमी केला तर अनेक वृक्षांना तोडण्यापासून वाचविले जाऊ शकते हेच ध्येय ठेऊन नाशिकचे प्रख्यात नवजात शिशु तज्ञ डॉ संजय आहेर यांनी त्यांचे हॉस्पिटल पूर्णपणे पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेऊन तो अमलात आणणारे डॉ संजय आहेर यांचे निओकेअर हे नाशिकमधील पहिलेच रुग्णालय ठरले आहे.
७५ ते १०० कागद लागतात एका रुगासाठी
याबाबतीत अधिक माहिती देतांना डॉ संजय आहेर म्हणाले की, एक रुग्ण दाखल झाल्यापासून त्याला डिस्चार्ज मिळेपर्यंत सुमारे ७५ ते १०० कागद त्याच्यासाठी लागतात. यामध्ये उपचार, त्याचे निरीक्षणे, त्याचे रिपोर्ट्स, औषधांचे प्रिस्क्रीप्शन, डिस्चार्ज समरी याचा समावेश असतो. साधारणपणे एका झाडापासून २० हजार कागदांची पाने बनतात. जर नाशिकमधील सर्व हॉस्पिटलचा एकत्रित संख्येचा आपण विचार केला तर किती कागदाचा वापर दर वर्षी होतो आणि पर्यायाने यासाठी किती वृक्षतोड करावी लागते ही संख्या चिंताजनक आहे.
याचसोबत कायद्याप्रमाणे रुग्णाच्या उपचारांची सर्व कागदपत्रे हि पुढील अनेक वर्षांसाठी सांभाळून ठेवावी लागतात. बालरोग रुग्णालयांसाठी तो रुग्ण १८ वर्षे वयाचा होईपर्यंत सांभाळणे बंधनकारक आहे.
या सर्वांचा विचार करतांना त्यांना माहिती मिळाली ‘प्रेस्को’ या अॅप ची. हा मुंबईमधील तीन युवांनी एकत्र येऊन तयार केलेला अॅन्ड्रॉईड अॅप आहे. या टॅब वर वापरल्या जाणा-या अॅपचा यशस्वी वापर गेल्या एकवर्षापासून मुंबईमधील २५० हून अधिक हॉस्पिटल करत आहेत. याचमुळे सुमारे २.५ कोटी कागदांची एका वर्षात बचत होऊन ३००० हून अधिक झाडे वाचली.
डॉ आहेर पुढे म्हणाले की, या टॅबवरील अॅपचा वापर अत्यंत सुलभ आहे. टॅब सोबत येणा-या एका विशिष्ट प्रकारच्या पेनने या टॅब वर लिहिता येते. जे विविध प्रकारचे रकाने एका रुग्णासाठी डॉक्टर व नर्सेसला भरावे लागतात ते सर्व पेन द्वारे टॅबमध्ये लिहिता येतात त्यामुळे हे वापरण्यास खूप सोपे आहे.
हॉस्पिटल सोबत हे अॅप तपासण्या करणारी लॅब आणि फार्मसी सोबत देखील जोडले गेले असल्याने कागदावर लिहायची तसेच प्रिंट काढण्याची गरज नाही आणि भविष्यात जर काही मेडिको लिगल केस झाली तर सदर कागदपत्रांची पीडीएफ कोर्टात ग्राह्य धरली जाते.
मुख्य म्हणजे कोणत्याही रुग्णास त्याची कागदपत्रे / रिपोर्टस् हवी असल्यास टी सर्व त्वरित पीडीएफ स्वरुपात रुग्णाला दिली जाऊ शकतात.
तसेच नवजात शिशुंची प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे कधीकधी कागद / फाईल द्वारे होऊ शकणारा जंतुसंसर्ग देखील टाळला जाऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले.
पेपरलेस हॉस्पिटल- एक दृष्टीक्षेप
१] ७५ ते १०० कागद लागतात एका रुगासाठी
२] एका झाडापासून २० हजार कागदांची पाने बनतात
३] मुंबईमधील २५० हून अधिक हॉस्पिटल सध्या पेपरलेस. याचमुळे सुमारे २.५ कोटी कागदांची एका वर्षात बचत होऊन ३००० हून अधिक झाडे वाचली.
४] कागद / फाईल द्वारे होऊ शकणारा जंतुसंसर्ग देखील टाळला जाऊ शकतो
५] कागदपत्रे / रिपोर्टस् हवी असल्यास ती त्वरित पीडीएफ स्वरुपात मिळण्याची सोय.