येथे आहेत एक पुलिंगी आणि एक स्त्रीलिंगी अशी दोन्ही शिव मंदिरे.

Advertisements

पुढच्या पिढीला आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसांची माहिती व्हावी असे वाटत असेल तर हळेबीड हे एक उत्तम उदाहरण आहे.

हळेबीड हे कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी या गावाला द्वारसमुद्र असे म्हणले जायचे. हळेबीड या गावाला तेथील मंदिरे, शिल्पे आणि तीर्थक्षेत्र यांमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. होयसळ राजांच्या कालखंडात (१२व्या शतकामध्ये) हळेबीड ही राजधानी होती. येथील होयसळ कालीन स्थापत्य कला आणि भव्य मंदिरे, जैन मंदिर यां मुळे हे स्थळ जणू वास्तुकलेचा रत्नांची खान आहे. तेथील होयसळेश्वर आणि केदारेश्वर ही मंदिरे आहेत.

पुढे १४व्या शतका मध्ये दिल्ली सल्तनतीचा चा सुलतान मलिक काफूर ने या भागाची लूट करून येथील संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या नंतर हे स्थळं बराच काळ दुर्लक्षितच होते.

येथील होयसळेश्वर मंदिर १२व्या शतकात येथील राजा विष्णूवर्धन यांनी तेथील मानवनिर्मित तलावाच्या किनारी बांधले. हे मंदिर या भागातील सगळ्यात मोठे शिवाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम जवळपास ४० वर्ष सुरू होते असे म्हणतात. हे एक जोडमंदिर आहे.यातले एक मंदिर होयसळेश्वर आणि दुसरे संताळेश्वराचे मंदिर आहे. एक पुलिंगी आणि एक  स्त्रीलिंगी अशी संकल्पना असलेली ही दोन्हीही शिव मंदिरे आहेत. विशेष म्हणजे या मंदिरासमोर दोन स्वतंत्र नंदी आहेत.

या मंदिराच्या भिंतींवर पुराणातील अनेक दंतकथा कोरल्या आहेत. बाहेरील भिंतीवर रामायण आणि महाभारतातील अनेक कथा आपल्याला दिसतात. मंदिराची कलाकृती डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. प्रत्येक भिंत आणि कलाकृती वर लिहायचे ठरवले तर एखादे पुस्तकच या मंदिरावर होईल. या अवर्णनीय कलाकृतीचे सौंदर्य डोळ्याने पहिल्याशिवाय उमजनार नाही. 

अनेकांनी या मंदिरावर अभ्यासपूर्ण लेखन केलेआहे व डॉक्युमेंट्री ही बनविल्या आहेत.

होयसळेश्वर मंदिर जेवढे सुंदर आहे त्याच तोडीचे केदारेश्वराचे ही मंदिर आहे. केदारेश्वराचे मंदिर राजा  वीर बल्लाळ आणि राणी केतलादेवी ११७३ ते १२२० च्या कालखंडामध्ये बांधले. हे मंदिर पुरातत्व खात्या कडून जतन करण्यात येत आहे. 

हे मंदिर साबणासारख्या मऊ वाटणाऱ्या, कोणतेही कोरीव काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा दगडापासून बनवले आहे. जमिनीपासून पाच ते सहा फूट उंच मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार आहे. या मंदिराला तीन गाभारे आहेत आणि यात ब्रम्हा, विष्णू आणि महेशाच्या मूर्ती आहेत. याच्या बाह्य भिंतीवर  पुरातन काळातील अनेक वेगवेगळ्या कथा कोरल्या आहेत. हे मंदिर ताऱ्याच्या आकारात बांधले असल्यामुळे हे इतर मंदिरापेक्षा वेगळे आहे.

या दोन्ही मंदिरासोबतच अनेक लहान मोठी मंदिरे या गावात आहेत, प्रत्येक मंदिराचे वेगळे वैशिष्टय आहे त्या मुळे तुमचा वेळ कसा जाईल हे कळणार पण नाही आणि काही तरी अद्भुत बघत आहोत याची अनुभूती येईल यात काही शंका नाही.

येथे तुम्ही होयसळेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, पुरातत्व विभागाचे संग्रालय, बेलूर मंदिर (१५ किमी), यागाची डॅम आणि जवळच असलेलं बदासी हल्ली हे ऐतिहासिक प्रसिद्ध जैन मंदिर तुम्ही पाहू शकता.

भेट देण्यास योग्य वेळ: ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा उत्तम 

कसे पोहचाल?

  • विमानाने मंगलोर विमानतळ १२५ किमी वर आहे.
  • रेल्वे ने हसन रेल्वे स्टेशन २७ किमी वर आहे.

मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद

Leave a Reply

You cannot copy content of this page