काही प्रश्न असे असतात की ती कोड्यातच टाकणारी असतात .त्याला काहीही उत्तर दिले तरी वादच होण्याची शक्यता असणार.
कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा??
अशा प्रश्नांची उत्तरं काही काळानेच सुस्पष्ट मिळतात. कालानंतर सुस्पष्ट उत्तर मिळत जाण्यास मदत होते.
आता आम्हाला रोज विचारला जाणारा प्रश्न –
कोव्हीड ची लस गर्भवतीने घेतली तर चालेल का?
उत्तर देण्यासाठी काही गोष्टींचा उहापोह होण्याचे गरजेचे आहे.
कोव्हीड 19 चा विळखा सगळ्यांनाच पडत चालला आहे . नवजात अर्भकांना पासून ते शेवटची घटका मोजणाऱ्या पर्यंत सर्वांना. काहींना covid-19 नुसताच मिठी मारून सोडून देतो तर काहींना घट्ट मिठीच मारतो. त्या अजगर मिठीतून काही धुरंधर आपली अलगद सुटका करून घेतात . तर काही निरोपच घेतात. असा हा अविश्वसनीय सरड्यासम व्यक्तीनुरूप रंग बदलणारा विषाणू.
आता गर्भावस्थेतील स्त्रियाही त्याला काही अपवाद नाही. त्यांनाही बाधा होतेच आहे. संसर्ग होतच आहे. परंतु गर्भवती स्त्रीयांना संसर्ग होण्याचे प्रमाण इतरांना ज्या प्रमाणात असते तेवढेच आहे अशी आजपर्यंतची आकडेवारी दर्शविते . समाधानाची बाब अशी कि गर्भवती स्त्री यांना प्रतिकार शक्ती कमी असूनही त्यांना खूप जास्त संसर्ग होण्याचा धोका आहे असे आकडेवारी दाखवत नाही.
आत्तापर्यंत जी काही आकडेवारी आहे त्या नुसार संसर्ग झालेल्या मातांना सौम्य स्वरूपात होण्याची व बरे होण्याचे प्रमाणही इतर स्त्रियां इतकेच आढळते .
साधारणपणे ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, मधूमेह, दमा यांना जसा धोका अधिक असतो त्याचप्रमाणे गर्भावस्थेतील महिलांना जर हे आजार असतील तर त्यांनाही धोका अधिकच असणार. अजून काही आकड्याकडे पाहिले तर आई पासून हा विषाणू संक्रमित होण्याचे प्रमाण नकारात्मक वाटत होते , यामध्ये आता मात सावध पवित्रा घ्यावा लागत आहे . परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. याबद्दल दुमत होण्याचे काहीच कारण नाही. HIV सारखे याचे विषाणू योनीमार्गे पसरत नाही हे आत्तापर्यंत तरी निर्विवाद आहे.
दुधावाटे हे विषाणू बाळापर्यंत जातात असा आजपर्यंत कुठलाही पुरावा नाही.
नुसता कोव्हीड झाला म्हणून लगेचच गर्भपात करण्याचे कोणतेही ठोस कारण सध्या तरी दिसत नाही.
वरील सर्व बाबी हेच दर्शवते कि खूप घाबरून जाण्याचे कारण नाही . गर्भावस्थेत योग्य मार्गदर्शन करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. उलट घाबरल्याने मानसिक संतुलन ढासळण्याचा धोका अधिक. तसेही बाळंतपणानंतर याचे (मानसिक त्रासाचे) प्रमाण थोडे अधिकच असते.
आता आपण अत्यंत कळीच्या मुद्द्याकडे येऊ.
“गर्भावस्थेत कोव्हीड लसीकरण करावे का?”
याचा जर आपण सारासार विचार करूया.
मानव जातीला covid-19 हा विषाणू तसा नवीनच .
आजपर्यंत त्याबद्दल त्रोटकच माहिती होती.
एक तर जागतिक महामारी, त्यात हा विषाणू नवीन . त्यावरील उपचाराबद्दल संदिग्धता. व्यक्तीनुसार बदलत जाणारा प्रतिसाद .
अशा परिस्थितीत ठोक विधान करणे अत्यंत अवघड.
आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणजेच ऍलोपॅथी म्हणजे
Evidence Based. अंदाज चालत नाही . माझे मत तुमचे मत वगैरे चालत नाही. ठोस पुरावा पाहिजे .
आकडेवारीचे पाठबळ पाहिजे.
परत जाणूनबूजून गर्भवती वर प्रयोग कोण करणार?
जे सी बी आय कमिटी ऑन व्हॅक्सिनेशन अँड ईम्युनायझेशन (joint committee on vaccination and immunisation)यांच्या सल्ल्यानुसार मापदंड लावाल मध्ये केवळ गर्भवती आहे म्हणून त्यांना बाजूला ठेवू नका आहे असे त्यांचे मत आहे.यामागे काही तार्किक आधार आहेच व उपलब्ध आकडेवारी सुद्धा आहे.
अमेरिकेत काहींना लस दिली गेली व त्या चुकून गर्भवती राहिल्या .काहींना चुकून दिला गेल्या- गर्भवतीस. तर काहींना लस दिली व लगेचच गर्भवती राहिल्या , तर काहींवर हे प्रयोग सुद्धा केले गेले .ही संख्या थोडी थोडकी नाही तर तब्बल 90 हजार इतकी आहे. सर्व स्त्रियांमध्ये काहीही तोटा मातांना अथवा नवजात बालकांना झाल्याचा आढळून आला नाही.
दुसरे कारण त्यांच्या अभ्यासानुसार शेवटच्या तीन महिन्यात जर गर्भवतींना संसर्ग झाला तर प्री मॅच्युअर बाळंतपणाचे प्रमाण जास्ती आहे.
तिसरे कारण संसर्ग झालेल्यांना अॅडमिट होण्याचे प्रमाण दोन ते तीन पटीने वाढते असा त्यांचा अभ्यास सांगतो.
त्यामुळेच अमेरिकेत गर्भावस्थेतील स्त्रियांसाठी लसीकरण खुले करण्यात येत आहे . इंग्लंड पण त्यांचीच री ओढत आहे . फरक इतकाच आहे की त्यांना फायझर किंवा मॉडर्न कंपनीची लस दिलेली असूल परवानगी वरील दोन कंपन्यांच्या लसीनाच आहे.
आता भारतात दिली जाणारी लस ही कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन नावाची आहे. आपल्याकडे आकडेवारी फारशी उपलब्ध नाही. आपण तार्किक मुद्द्यांचा आधार घेऊ.
गर्भावस्थेतही बऱ्याच प्रचलित लशी दिल्या जाताच. त्या मृत विषाणु पासून बनवलेल्या असतात. अशा लशी धोकादायक नसतात हे सिद्ध झालेलं आहे . गर्भावस्थेतील स्त्रियांना डांग्या खोकला ची लस धनुर्वाता बरोबर दिली जाते. उदाहरणार्थ Tdap किंवा boostrix. फ्लू ची पण लस दिली जाते .या दोन्ही लशी मृत्त विषाणूंपासून बनवलेले असल्यामुळे त्यांचा धोका नसतो व त्यांना मान्यताही मिळालेली आहे.
काळच जर आ वासून ऊभा असेल तर किती काळाची वाट पाहणार? हातातील आकडेवारी व मुद्देसुद तर्कवारी यावर निर्णय घेण्यात काहीही गैर नाही.
कोव्हीड विषाणू वरील वापरली जाणारी लस मृत वायरस पासूनच बनवलेले असल्यामुळे त्याचा काही वेगळा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही .मृत्यू झाल्याचे आत्तापर्यंत काही निष्कर्ष नाहीत.
या लशीत मध्ये ईतर काही घटक नाहीत कि जे गर्भावस्थेत साठी घातक आहेत.
कोव्हीड चा धोका पत्करणे यापेक्षा लसीकरण करणे केव्हाही चांगलेच. भारतातील स्त्री रोग तज्ञ संघटना याबाबत लसीकरणासाठी अनुकूल आहे . पण यास अजून सरकारची संमती नाही .ती प्रलंबित आहे .
त्यामुळे आपण आजतरी गर्भावस्थेतील स्त्रियांना लस देऊ शकत नाही . बाळंतपणानंतर मात्र ही लस आजही निश्चितच देता येते .काही कालांतराने सरकारची सुद्धा यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
लसावी हाच की लसीकरण गर्भावस्थेत तेही करण्यात यावे व गर्भारपण हा त्यास अडथळा ठरू नये.
डाॅ. अभय सुखात्मे.
स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र तज्ञ.
नाशिक