आरोग्यदायी सुंठ वडा बनवण्याची पारंपरिक आणि योग्य पद्धत.

Advertisements

रामनवमी व हनुमान जयंती चैत्र महिन्यात येते. चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतू आणि या ऋतू मध्ये होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, अॅलर्जी असे त्रास होतात.

प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते.

सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे. आलं वाळवलं की सुंठ बनतं. आलं उष्ण आहे. ते पचल्यानंतर तिखट रस बनतो तर सुंठ पचल्यानंतर गोड रस बनतो. म्हणून एकाच वेळेला शरीरातील वात व कफ कमी होतो, म्हणून च कि काय आपल्याकडे सुंठ आणि खोकला या यासंदर्भात म्हण देखील आहे “सुंठी वाचून खोकला..” सुंठाला विश्वा’ असं दुसरं नाव आहे. अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला विश्वऔषध असे म्हणतात.

आता पारंपारिक पद्धतीने सुंठवडा बनवताना त्यात फक्त्त 6 घटक वापरले जातात. सुंठ,सुके खोबरे, खडीसाखर, धणे,ओवा,वेलची..आणि हे सर्व 6 घटक दगडी खलबत्ता वर बारीक वाटून सुंठ वडा तयार केला जातो.

यातील या घटकाचे फायदे जाणून घेऊया :

सुंठाचे फायदे:

कंबरदुखी, आमवात, संधीवात यावर सुंठ उपयुक्त आहे. मासिक पाळीच्या वेळेस उद्भवणारी पोटदुखी आणि प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वावस्थेत आणण्यासाठी सुंठ फायदेशीर ठरते. तसंच नैराश्य येणं, भीती वाटणं, आत्मविश्वासाची कमतरता यांसारखे मानसिक त्रास होऊ नयेत म्हणून देखील सुंठ फायदेशीर आहे.

खडी साखरेचे फायदे:

चवीला गोड असणारी खडीसाखर मध्ये औषधी गुणधर्म असतात, आयुर्वेदात खडीसाखरेचे थंड, पौष्टिक, गोड, हलकी, बलवर्धक, डोळ्यांना हितकारक, उलटीवर उपयुक्त असे आरोग्यदायी गुणधर्म सांगितले आहेत. खडीसाखर चघळल्यास कफाचा त्रास कमी होतो, घशातील खवखव, खोकला दूर होतो. उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखर टाकलेले पाणी पिल्याने शरीराला ताकद मिळते. खडीसाखर ताणतणाव कमी करण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचस हि मदत करते.

सुके खोबरे:

नारळ कल्पतरू आहे. त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. नारळाच्या आतील खोबरे, ओले, वाळलेले, नारळाचे दूध तीनही वेगवेगळय़ा प्रकारे आरोग्य राखण्याचे व रोगनिवारण्याचे काम करतात. स्मरणशक्ती आणि शारीरिक वाढीसाठी सुके खोबरे हे अत्यंत फायदेशीर ठरते. नारळ आणि केस हे महत्वपूर्ण समीकरण आहे. सुके खोबरे हे अत्यंत बलवर्धक,शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक सुद्धा आहे.

धणे

धणे पित्ताचे आजार असणाऱ्यांसाठी वरदान आहेत. धण्यामध्ये विटामिन C असल्यामुळे जीवणूरोधकांचे काम करते. धणे हे पाचनक्रिया सुधारण्यास हि मदत करते.

ओवा

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो.पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो.

वलची

 ऍसिडिटीसाठी, तणावमुक्त राहण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी वेलची मदत करते.

आता सुंठवडा किती प्रमाणात खावा?

सुंठवडा हा उष्ण असल्यामुळे हा कमी प्रमाणात खावा.. म्हणून च आपण प्रसाद म्हणून सुंठवडा खातो. रामनवमी नंतर 10 ते 12 दिवस रोज दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान जेवणानंतर एक चमचा सुंठवडा नक्की खा. पित्त व उष्ण प्रकृती असलेल्यांना सुंठवडा फार सहन होईल असे नाही म्हणून त्यांनी सुंठवडा साजूक तुपासोबत खावा.

थोडक्यात काय तर आपल्या या भारतीय परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेवून सण साजरे केले पाहिजेत.

डॉ. प्रवीण केंगे

अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल

राणे नगर-9270433863 गंगापूर रोड-9130973950 नाशिक रोड-9075033863 निफाड-7057405962

Leave a Reply

You cannot copy content of this page