भारतातील या राज्यात आहे एक तरंगते गाव ..!

Advertisements

या तलावाला केवळ तलाव म्हणणे दिशाभूल करणारे ठरेल. हे खरेतर एक तरंगते गाव आहे. ईशान्य भारतातील मणिपूर मधील हा तलाव त्या भागातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे. मणिपूर च्या बिष्णुपूर जिल्ह्यातील हा तलाव इंफाळ पासून ५३ किमी दूर वर आहे. जसे आपण पराशर लेक मध्ये एक छोटे तरंगते बेट पाहिले होते तशी असंख्य बेटे (फुमडी) या तलावात आहेत. म्हणून या तलावाला स्थानिक लोक फुमडी तलाव असे ही म्हणतात. 

या बेटांवर लोकांची वस्ती आहे असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खरेच येथे लोक राहतात. मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. त्यांची मुले त्याच बेटांवर खेळतात बागडतात. एवढेच काय तर त्यांची शाळा पण अशा बेटावरच भरते. असे तरंगते गाव मी पहिल्यांदा कंबोडिया मध्ये सियाम रीप जवळ पाहिले होते पण जेव्हा भारतात पाहिले तेव्हा तो सुखद धक्काच होता. 

ह्या तलावाचे क्षेत्रफळ २८७ चौ. किमी आहे. या तलावाच्या सभोवताली साधारण ५५ लहान मोठी गावे वसलेली आहेत आणि त्या गावांमध्ये साधारण एक लाख लोक राहतात. या तलावातील आणि सभोवतालचे लोक दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी लोकटक दिवस साजरा करतात. 

या तलावातील सर्वात मोठ्या फुमडीचे क्षेत्रफळ ४० चौ. किमी आहे. हे बेट तलावाच्या आग्नेय दिशेला आहे. या फुमडी वर असलेले किबूल लांमजॉ राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. एल्डस् डीअर या हरिणाच्या लोप होत चाललेल्या प्रजातीतील संगै ही जात केवळ याच राष्ट्रीय उद्यानात मिळते.

या तलावाचे मणिपूरच्या आर्थिक विकासात मोठे योगदान आहे. याच पाण्याने अनेक गावांची तहान भागते, याचा शेती साठी वापर होतो आणि मुख्यतः जल विद्युत निर्मितीसाठी या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच मोठ्या प्रमाणात मासेमारीही या तलावात होते. अर्थात, या सर्व मानवी हस्तक्षेपामुळे मुळे या तलावाची थोडी नैसर्गिक हानी होत आहे आणि हा चिंतेचा विषय झाला आहे. 

हा तलाव पक्षांसाठी नंदनवन आहे. या भागात बरेच सर्वसामान्य पक्षी तसेच काही विशिष्ट पक्षी याच दिसतात. यात प्रामुख्याने उत्तरी टेकडी मैना, काळ्या पतंगी पक्षी, हिमालयीन किंगफिशर, पूर्व जंगली कावळे, आणि बर्मी पायंड मैना असे अनेक पक्षी दिसतात. 

लोकटक तलावावर बेतलेल्या पर्यावरणाच्या गंभीर समस्येचे परीक्षण करणारा “फॅम शँग” नावाचा शोधपट हाक बाम पबांकुमार याने दिग्दर्शित केला आहे. या चित्रटाला नुकताच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा सुवर्ण शंख पुरस्कार मिळाला आहे.

लोकटक तलावामध्ये बोटिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या तलावामध्ये एकच रिसॉर्ट असून तेथे मुक्काम करायचे असेल तर फक्त उन्हाळ्यामध्ये जावे लागते. ह्या भागाचे पर्जन्यमान इतर भारताच्या तुलनेत सरासरी पेक्षा जास्ती आहे. इथे जवळपास वर्षभर पाऊस असतो. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने बऱ्यापैकी कोरडे म्हणजेच उन्हाळ्याचे असतात त्यामुळे या दोन महिन्यांतच भेट देण्यास योग्य वेळ आहे. 

साधारण तापमानः

√ जानेवारी ते मार्च ५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियस पर्यंत. 

√ एप्रिल ते ऑगस्ट १६ अंश सेल्सियस ते ३० अंश सेल्सियस पर्यंत.

√ सप्टेंबर ते डिसेंबर १८ अंश सेल्सियस ते २६ अंश सेल्सियस पर्यंत.

कसे पोहचाल: 

√ जवळचे विमानतळ इंफाळ ४५ किमी वर आहे. 

√ जवळचे रेल्वस्थानक जरीबां स्टेशन २४० किमी (मीटर गेज) वर आहे. 

√ इंफाळ पासून रस्त्याने जाता येते साधारण ४५ किमी अंतर आहे.

मंगेश कपोते, हेरंब ट्रॅव्हल्स, औरंगाबाद

Leave a Reply

You cannot copy content of this page