नाशिकची सर्वांगीण प्रगती होण्याच्या ध्यासाने प्रेरित झालेल्या नाशिककरांची अराजकीय चळवळ ‘मी नाशिककर’ – नाशिक २.० च्या सल्लागार समितीची एक बैठक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या मार्गदर्शनाखाली ई एस डी एस येथे नुकतीच संपन्न झाली.
2018 मध्ये पियुष सोमाणी, उमेश वानखेडे, संजय कोठेकर, किरण चव्हाण व मनीष रावल या विविध क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. आजमितिला जवळपास 26 विविध व्यावसायिक व सामाजिक संस्थांमधील 88 हून अधिक नामवंत नाशिककर या चळवळीशी जोडले आहेत.
‘मी नाशिककर ‘ ही चळवळ इंडस्ट्री, आय. टी. व ट्रेड या त्रिसूत्रीवर काम करत असून मोठे उद्योग नाशिक मध्ये यावेत तसेच इन्फ्रास्ट्रक्चर, दळणवळण, कृषी प्रक्रिया उद्योग, वाईनरी, मेडिकल टुरिझम या बाबींसाठी विविध स्तरांवर पाठपुरवठा करत आहे.
‘मी नाशिककर ‘ सल्लागार समिती –
अशोक कटारिया, अनंत राजेगावकर, किरण चव्हाण, उमेश वानखेडे, पियुष सोमाणी, विलास शिंदे, डॉ. राज नगरकर, सुधीर मुतालिक, मनीष रावल, संजय पैठणकर, संतोष मंडलेच्या, आर्कि. विवेक जायखेडकर , आर्कि. धनंजय शिंदे, एच् ए एल प्रतिनिधी यात असून संजय कोठेकर हे सीईओ आणि समन्वयक म्हणून काम बघत आहेत.
बैठकीत चर्चा झालेले मुद्दे असे –
१) ‘इज ऑफ डूइंग बिजनेस’ या अंतर्गत उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व माहिती एकत्रित करून पोर्टल तयार करणे. तसेच सिंगल विंडो सिस्टीम तयार करणे.
२) कागदोपत्री नाशिक मध्ये अतिरिक्त पाणी साठा नाही. त्यामुळे डी एम आय सी सारखे प्रकल्प नाशिकला आले नाही. त्यामुळे वैतरणा धरणाचे अतिरिक्त २५ टीएमसी पाणी मुकेणे धरणात वळवणे. जेणेकरून उद्योगांसाठी राखीव आणि साठा होऊ शकेल. तसेच नार पार चे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे.
३) नाशिक विमानतळाचे ब्रँडिंग उत्तर महाराष्ट्राचे विमानतळ असे करावे जेणेकरून अधिक प्रवासी येऊन विमान सेवा नियमित होण्यास मदत होईल.
४) मुंडेगाव येथील प्रस्तावित ट्राय पोर्ट प्रकल्पास गती देणे. जेणेकरून कृषी निर्यातीसाठी मदत होईल.
५) आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठाचा पाठपुरावा करणे.
६) राजू बहुला येथील प्रस्तावित प्रकल्पामध्ये २० टक्के जागा आयटी पार्क साठी राखीव ठेवणे . आजमितिला ‘मी नाशिककर ‘च्या प्रयत्नांनी 40 लाख स्क्वेअर फुट जागेची मागणी विविध सॉफ्टवेअर कंपन्यांनी नोंदवली आहे.
७) नाशिक – पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींना विनंती करणे .
८) नाशिकच्या बाहेरील रिंग रोड हा भविष्यातील गरज ओळखून 30 मीटरच्या ऐवजी 60 मीटर करणे.
९) कृषी प्रक्रिया उद्योगासाठी नाशिकला केंद्रस्थानी ठेवून शासकीय स्तरावर एक धोरण तयार करण्यासाठी पाठ पुरावा करणे. सध्या राज्यात फक्त ऊस या पिकासाठी असे धोरण आहे.तसेच धोरण अन्य फळांसाठी देखील असावे.
१०) पर्यटन वाढीसाठी नाशिक व्हॅली या साठी प्रयत्न करणे यामध्ये इको वेलनेस, मेडिटेशन ,पर्यावरण ,वाईनरी, एडवेंचर, धार्मिक अशा विविध टुरिझम साठी प्रयत्न.
११) शहरातील विविध संस्थांसोबत अधिक समन्वय साधून नाशिकच्या हितासाठी विचार करणारा दबाव गट तयार करणे.
१२) शासकीय जागेची उपलब्धता आणि त्याच्या युज सहित एकत्रित पणें उपलब्ध असावी .
अश्या प्रकारच्या बैठकीचे आयोजन दर महिन्यात करून करून विविध बाबीचा आढावा घ्यावा अशी सूचना देखील विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली.