बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाईचा शहर विकासासोबत जनसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात नेहमीच सिंहाचा वाटा असून बांधकामामध्ये महत्वपूर्ण अंग असलेल्या बांधकाम कामगारांसाठी देखील क्रेडाईने भरीव कार्य केले असल्याचे प्रतिपादन क्रेङाई नाशिक मेट्रो चे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले. ते क्रेडाईच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बांधकाम कामगारांसाठीच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या शिबिराचे आयोजन सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या सहकार्याने गंगापूर रोड वरील श्रीजी एक्सेल्सिया येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी मंचावर क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार (घटना समिती) जितुभाई ठक्कर, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनिल कोतवाल, माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, नेमीचंद पोतदार, मानद सचिव गौरव ठक्कर, उपाध्यक्ष कृणाल पाटील, कमिटी सदस्य नरेंद्र कुलकर्णी तसेच सिक्स सिग्मा हॉस्पिटलच्या डॉ अनुप्रिया देशपांडे हे उपस्थित होते.
रवी महाजन पुढे म्हणाले की, नाशिकहून जन्मलेल्या क्रेडाईचा विस्तारआज देशपातळीवर झाला असून नाशिकमध्ये वूमन्स विंग, युवा विंग सहित ५०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक क्रेडाईचे सदस्य आहेत. कामगारांसाठी विविध स्तरावर क्रेडाई कार्य करते. यामध्ये त्यांच्यासाठी नियमित प्रशिक्षण तसेच त्यांच्यापर्यंत विविध शासकीय योजनांची व कागदपत्रांची माहिती देणे, त्या योजनांचा लाभ कामगारांना मिळावा यासाठी पाठपुरावा करणे हि प्रमुख आहेत. यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन च्या काळात काम बंद असतांना त्यांची उपासमार होऊ नये यासाठी देखील क्रेडाईने कार्य केले असल्याचे देखील ते म्हणाले.
येत्या एका वर्षात क्रेडाई नाशिकमध्ये अद्ययावत एस्क्सिलंस सेंटर उभारणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
या प्रसंगी उपस्थित क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर म्हणाले की, क्रेडाई नाशिक मेट्रोचे कार्य हे देशपातळीवर दिशा दाखविण्याचे काम करते. एकत्र राहिल्याने सर्वांगीण उन्नती साधता येत असून क्रेडाईने पुढील दहा वर्षानंतर नाशिक कसे असेल असे विजन डॉक्युमेट तयार करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
आपल्या मार्गदर्शनात क्रेडाई स्थापनेच्या आठवणीना क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार (घटना समिती) जितुभाई ठक्कर यांनी उजाळा दिला, ते म्हणाले १९८७ ला जेव्हा क्रेडाईची स्थापना झाली त्या काळात बांधकाम व्यावसायिकांकडे बघण्याचा जनसामान्यांचा दृष्टीकोन हा सकारात्मक नव्हता. पण आज ३४ वर्षानंतर जनसामान्य तसेच शासन देखील बांधकाम उद्योगाकडे सन्मानाने बघत असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, नेमीचंद पोतदार यांनी समयोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये सर्व माजी अध्यक्षांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना गौरव ठक्कर यांनी केली तर आभार नरेंद्र कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बागड यांनी केले.