यशोगाथा- प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या या मराठमोळ्या उद्योजकाची कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे
कोरोना कालावधीत अनेकांचे रोजगार गेले. सर्व क्षेत्रातील उद्योग ठप्प पडले. अशा वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील इंजिनियर अक्षय अशोक काटकर यांनी अमेझ ग्रुपची स्थापना केली. अमेझ ग्रुपमध्ये आर्किटेक्चर प्लानिंग, थ्रीडी डिझाईन, स्टक्चरल डिझाईन, इंटेरियर डिझाईन,सर्वेयिंग, मोजणी, लैन्डस्केपींग व कन्सल्टिंग इंजिनीअरिंगमधील होणारी सर्व कामे ते करतात. आज अमेझ ग्रुपनी अल्पावधीतच मोठी उलाढाल केली आहे. भाजीपाला विक्रेते बेरोजगार इंजिनीअर ते अमेझ ग्रुपचे डायरेक्टर म्हणून त्यांनी आज वेगळी ओळख आपल्या कामातून निर्माण केली. त्यांची उद्योजकसाठी घेतलेली हि खास मुलाखत…
नाशिक येथे आयोजित सेवाह आंत्रप्रीनर्स कोनक्लेव २०२० मध्ये इंजीनीयर असलेले श्री. अक्षय काटकर यांची ओळख करून देण्यात आली. तळागाळातून आलेले बेरोजगार तरुण, भाजीपाला विक्रेते म्हणून काम केलेले श्री.काटकर आज कोट्यवधीची उलाढाल अमेझ ग्रुपतर्फे करतात त्यांच्याशी ओळख करून घेत मी त्यांची उद्योजकसाठी मुलाखत घेतली. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल विचारले असता ते म्हणाले कि, माझा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे झाला आहे. माझे आईवडील हे दोघेही शेती करतात. माझे प्राथमिक शिक्षण गंगापूर तालुक्यातील जाखमाथा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर मी पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण गंगापूरच्या न्यू हायस्कूलमध्ये घेतले. नंतर बी.ए.पदवी घेतली. त्याचवेळेस मी औरंगाबादच्या हायटेक कॉलेजमध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश घेतला. मला बांधकाम क्षेत्रात रस असल्यामुळे मी हे शिक्षणाचे क्षेत्र निवडले.
माझे सर्व शिक्षण मराठी शाळेमध्ये झाल्यामुळे डोक्यावरून सगळी इंग्लिश गेली असल्याचे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणजे मी पहिल्याच वर्षी नापास झालो. त्यानंतर मी पुन्हा नव्याने डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरच्या गरीब परीस्थितीची जाणीव होती व परिस्थिती बदलण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे असे मनोमन वाटू लागले म्हणून शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला. कॉलेजची फी व इतर बाबींसाठी मी गंगापूर शहरातील नामवंत विधिज्ञ बी.पी. जोशी यांच्याकडे संगणक टायपींग करीत असे. शालेय शिक्षण घेत असताना सुद्धा मी आणि माझा लहान भाऊ गौरव भाजीपाला विकत असू. हेच ते उद्योगाचे बाळकडू मला लहान वयातच मिळाले असल्याचे श्री काटकर यांनी स्पष्ट केले.
इंजीनिअरिंग झाल्यानंतर मी लगेच इंटरनेट कैफे चालू केला. माझे चुलते व आतेभावाचे प्रिंटींग प्रेस असल्यामुळे मी त्यांच्याकडेही काम केले. थोड्या पैशाची बचत केली. त्यावेळी इंटरनेट हे लोकांची गरज बनले होते हे ओळखून मी नेट कैफे गंगापूर शहरात टाकला. एका मित्रासोबत केलेला हा बिझनेस दोन महिन्यानंतर बंद पडला. अपयश काय असते याचा पूर्ण धडा घेतला. पैशाची चणचण भासू लागल्यामुळे नोकरी करणे भाग पडले. अनेक वेळा विचार करायचो कि मी चांगले टायपिंग करतो तर हा व्यवसाय करून पाहावा म्हणून गंगापूर दिवाणी न्यायालयासमोर संगणक टायपिंगचा व्यवसाय चालू केला. त्यावेळेस सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजि. वाय.टी.कंगणकर साहेब, वकील मनोरकर, पानकडे साहेब यांची खूप मोलाची मदत मिळाली. माझा संगणक टायपिंगचा बिझनेस चांगला व्यवस्थित स्थिरस्थावर होत असताना टपरी मालक यांनी त्रास द्यायला सुरवात केली. ते माझ्याकडून जास्त भाडे आकारू लागले. मला त्यांचे बोलणेही सहन होत नसे. या जाचातून सुटका व्हावी म्हणून मी पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मी पुहा जोशी साहेबांकडे नोकरी करण्यास सुरुवात केली. व्यवसायातून नोकरी आणि नोकरीतून व्यवसाय असा प्रवास वारंवार घडू लागला असल्याचे श्री.काटकर यांनी सांगितले.
जोशी साहेबांकडे अनेक नामवंत उद्योजक, बिल्डर येत असत. ते पाहून मला असे वाटायचे कि आपण नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हायचे. पण ते कसे शक्य आहे. ती काय जादूची कांडी आहे काय? असे विचार येऊ लागले. परंतु मला माहित होते कि मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे काम करत राहिलो. घरची परीस्थिती बेताची असल्यामुळे झगडत राहिलो. मिळेल ते काम करत राहिलो. कारण मला माझं उद्योजक व्हायचं स्वप्न होत. मध्ये मध्ये याला तपासायचो पण हाती काहीच लागत नव्हत. वडिलांना त्यावेळी काही लोक म्हणायची कि याला ट्रक्टर ड्रायव्हर करा. पण मला काहीतरी वेगळे करायचे होते. माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करायचा होता म्हणून मी आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला शिकलो. पण समस्या काही केल्या कमी होत नव्हत्या. त्यातच माझ्या वडिलांचा भयंकर अपघात झाला. त्यांचा पाय निकामी झाला.
प्रत्येकवेळी नवीन संकट माझ्यासमोर ठाण मांडत असे.त्यामुळे पैशाची खूपच कमतरता भासत असे. अनेकवेळा वाटायचे कि आत्महत्या करावी. पण घरच्या जबाबदारीमुळे मी पुन्हा जगण्याचा निर्णय घ्यायचो. अशातच मला पुस्तक वाचनाची गोडी निर्माण झाली. स्वामी विवेकानंदाचे कर्मयोग पुस्तक मी वाचले आणि माझे जीवनच बदलवून टाकण्याचा मी निर्णय घेतला. पुस्तक घेण्यासाठीहि पैसे नसायचे. पण अडीअडचणीतून मार्ग काढून मी पुस्तक वाचत राहिलो. सध्या माझ्याकडे एक हजार पुस्तके संग्रही आहेत. पुस्तकांनी मला माझ्या जगण्याचा मार्ग सुकर केला असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.
दरम्यान मला चांगल्या पगाराची एम.एन.सी. कंपनीत नोकरी लागली. थोडा पैसा जास्त मिळू लागला. बचतीची सवय जोपासली. मी माझे पैसे वाचवून छोट्या मोठ्या बिझिनेस सेमिनारला जात असू यात मला खुप माहिती मिळत गेली. व्यवसाय कसा करावा, का करावा याचे शास्त्र मला कळले. विविध संस्थाना भेटी दिल्या. काही बिझिनेस संदर्भात प्रशिक्षण घेतले. यात एम.सी.ई.डी.,सेवाह एज्युकेशन हब यांना भेटी दिल्या. सेवाह एज्युकेशन नाशिकच्या आश्विनी धुप्पे यांना माझ्या सर्व परिस्थितीविषयी सांगितले. त्यांनी बिझिनेस संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मी २००८ ते २०२० पर्यंत नोकरी व्यवसाय अशा व्यापात अडकलो होतो. आता मी माझ्या व्यवसायाच्या, उद्योगाचे स्वप्न पूर्ण करण्यास सज्ज झालो.
इंजिनीअर असलेल्या श्री. अक्षय काटकर यांनी सुमूहर्तावर अमेझ ग्रुपची स्थापना केली. दिनांक २८/०८/२०२० रोजी लाकडाऊनमध्ये अमेझ ग्रुपचे पहिले ऑफिस गंगापूर शहरात सुरु केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे इंजिनियर मित्र मंगेश नरोडे याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्री. नरोडे यांस १२ वर्षाचा स्टक्चरल अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवण्यासाठी मी त्यांच्याशी भागीदारी केली. औरंगाबाद येथे सुद्धा आम्ही ऑफिस चालू केले आहे. आजमितीला अमेझ ग्रुपमध्ये आर्किटेक्चर प्लानिंग, थ्रीडी डिझाईन, स्टक्चरल डिझाईन, इंटेरियर डिझाईन, सर्वेयिंग, मोजणी, लैन्डस्केपींग व कन्सल्टिंग इंजिनीअरिंगमधील होणारी सर्व कामे केली जातात.
अमेझ ग्रुपची अनेक वैशिष्ट काळानुरूप सिद्ध झाली आहेत. त्यांच्याकडे अनुभवी टीम आहे. त्यांचे सर्व प्लन हे नाविन्यपूर्ण असून संपूर्ण स्टक्चरल डिझाईनसह आहेत. प्रत्येक कामाची टेक्निकल टेस्टिंग केली जाते. प्रत्येक कामाचा प्लान विंडो, डोअर व अनेक प्लान ग्राहकास दिले जातात. प्रत्येक धर्माच्या वास्तुशास्रासह हे दिले जाते. ग्राहकांचा प्रत्येक महिन्याला फिडबैक, प्रतिसाद हा घेतला जातो. शंभर टक्के पारदर्शी काम, २१ साईट व्हिजीट व जोब कार्ड असे अनेक प्रकारची गुणविशेष सांगता येतील. या आधुनिक युगात नाविन्यपूर्ण काय आणि कशा प्रकारच्या सेवा देता येतील याविषयी आम्ही नेहमीच अग्रेसर राहत असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले.
या कॉक्रीटच्या युगामध्ये झाडांची संख्या खुप कमी होत आहे त्यासाठी त्यांनी एक घर एक झाड हा उपक्रम सुरु केला आहे त्यासाठी त्यांनी प्रोत्साहनपर सन्मानचिन्हही दिले जात असल्याचे सांगितले. सामाजिक कार्याची आवड लहानपणापासून जोपासल्यामुळे आपण समाजाचे काही देणे लागतो या कार्यासाठी क्रीएटीव्ह युथ फौंडेशनची स्थापना केली आहे. श्री. काटकर ज्या जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकले त्या शाळेला त्यांनी संगणक भेट दिली आहे. दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. विद्यार्थ्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून शाळेची, विद्यार्थाची गुणवत्ता कशी वाढीस लागेल यासाठी श्री काटकर यांनी सहकार्य केले आहे. पुढेही करत राहणार. वृक्षारोपणाची चळवळ व्यापक करून वृक्षाचे जतन करण्यासाठी नेहमी त्यांचा कटाक्ष असतो. या सर्व कार्यात त्यांचे मित्र रवींद्र एरंडे, अड मानसी जोशी, प्रसाद चव्हाण, संतोष भिंगारे यांचा सक्रीय सहभाग असल्याचे श्री. काटकर यांनी सांगितले. अशा उपक्रमशील उद्योजकास मी पुढील वाटचालीसाठी उद्योजकतर्फे शुभेच्छा व्यक्त करून मी त्यांची रजा घेतली.
श्री. दीपक केदू अहिरे, पत्रकार- नाशिक