नाशिकला वास्तुशास्त्राची समृद्ध परंपरा लाभली असून . त्या संस्कृतीला खऱ्या अर्थाने जपणाऱ्या, वाढवणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या मोजक्या आर्किटेक्ट मध्ये संजय पाटील हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज जगभरात नाशिकचे नाव त्यांनी उंचावले आहे, त्यांच्या ह्या यशस्वी कारकिर्दी मागे दडलेल्या आर्किटेक्टचा, माणसाचा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्यांच्या शैलीचा धांडोळा घेणारी ‘अन्वेष’ या डॉक्यूमेंट्री ला सलग दोन आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सन्मानित करण्यात आले आहे.
नुकत्याच मुंबई मध्ये पार पडलेल्या शून्यतम इंटरनॅशनल फेस्टिवल मध्ये अन्वेष ला बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणून तर दिल्ली येथील 9 व्या लेक सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या डॉक्युमेंटरी ला स्पेशल ज्युरी मेंशन हे अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ह्यात जगभरातील अनेक देशातून फिल्म सहभागी झाल्या होत्या.
थोडं फिल्म विषयी
अन्वेष म्हणजे शोधणे, एक्सप्लोर करणे. आज आपल्याला करमणूक आणि कला ह्यांचा सिनेमा, टीव्ही, मोबाईल ह्यामधून भडिमार होतो आहे. ह्या मध्ये मूळ कला, कलाकार, त्याचा प्रवास, हे हरवत चालले आहे. एखाद्या मोठ्या कलाकाराला, व्यक्ती ला आपण आयडॉल मानावे असे फार कमी लोक आहेत. विशेषतः आर्किटेक्चर हा तर कलाप्रकार नुसता आपल्या जीवनाशी जोडला नसून तो आपल्या संस्कृती, इतिहास इ. शी थेट निगडित आहे. परंतु सध्या मात्र हे चित्र थोडं बदलताना दिसतंय. इतर कला, त्यांचा अंतर्भाव आणि त्यांच्याशी समरसता हे कुठेतरी हरवत चाललंय. त्याअनुषंगाने संजय पाटील ह्यांच्या व्यक्तित्वचे पैलू, त्यांचे कुसुमाग्रजांशी असलेले नाते, सर्व क्षेत्रात असलेली मुशाफिरी आणि त्यांच्या इमारती, त्याचा अवकाश इ. विषयी ही फिल्म भाष्य करते.
स्वतः व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या आणि सध्या फिल्म मेकिंग या क्षेत्रामध्ये कार्यरत आर्किटेक्ट जयेश आपटे यांनी ही फिल्म बनवली आहे. जयेश आपटे यांच्या उपमुखम आणि धगड या फिल्म्स ना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
या डॉक्यूमेंट्री ची निर्मिती– रावी मोशन पिक्चर्स, ऋतम प्रोडक्शन, व फेदर टच स्टुडिओ. यांनी केली असून दिग्दर्शन जयेश आपटे यांनी केले आहे.
संगीतकार– अमित पाध्ये., व्हॉइसओव्हर- प्रशांत साठे,कॅमेरा आणि एडिटिंग- आदित्य रहाणे
ध्वनी– शुभम जोशी, सबटायटल्स- स्नेहा पाटील, सुलेखन- चिंतामण पगारे
तंत्र– मल्हार केळकर, आकाश पाठक
या साठी विशेष सहाय्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विजया पाटील, अनघा पाटील, मिनाझ अन्सारी, मृणाल आपटे.यांनी केले आहे