आजपर्यंत काही शासकीय नियमांमुळे महिलांना खाण क्षेत्रात मर्यादित स्वरूपात कार्य करता येत होते. परंतु आता नवीन नियमावली नुसार हे क्षेत्र महिलांसाठी खुले झाले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केल्याने संस्थेमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकत. हे लक्षात घेऊन खाण उद्योगात नाशिकचे नाव जागतिक नकाशावर आणणाऱ्या नाशिकच्या एपिरॉक मायनिंग इंडिया लि. ने आता आपल्या उद्योगात अधिकाधिक महिलांना संधी देण्याचे ठरवले असल्याचे प्रतिपादन एपिरॉक नाशिकचे महाव्यवस्थापक अरविंद पाटील यांनी केले.
एपिरॉक मायनिंग इंडिया लि. ही स्वदेशी बहुराष्ट्रीय कंपनी १९७० पासून नाशिकच्या सातपूर औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहे ६०,५००स्क्वे . मी . एवढ्या विस्तीर्ण परिसरात कंपनीचे उत्पादन होत असून ३००हून अधिक कुशल कर्मचारी येथे कार्यरत आहेत . यामध्ये ५० महिला इंजिनियर्स विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत .
स्वीडन मधील स्टॉकहोम येथे मुख्यालय असलेल्या एपिरॉकचा विस्तार हा जगातील सुमारे १५० देशांमध्ये असून भारतात नाशिक आणि हैदराबाद येथे कंपनीचे उत्पादन होते.
आगामी काळात एपिरॉकतर्फे ऑपरेशनल भूमिकांमध्ये महिलांची संख्या दुप्पट करायचे ठरविले असल्याचे सांगत अरविंद पाटील म्हणाले महिला या सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्या सहभागाने कामात कलात्मकता व नावीन्य येते. तसेच कंपनी मध्ये चांगल्या संवादाची निर्मिती होते . महिला सक्षम झाल्यास कुटुंब व देश सक्षम होण्यास निश्चित मदत होईल.
गेल्या एक दशकाहून अधिक काळ एपिरॉक मध्ये डिझाईन आणि विकास टीम लिडर म्हणून कार्यरत असणाऱ्या मिताली गुजराथी –शितुत यांनी सांगितले की ,पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात एपिरॉकने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व आत्मनिर्भर सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला असून यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल . एपिरॉक तर्फे कर्मचारी व समाजातील विविध घटकांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात.