नाशिक मधील एक प्रमुख वसाहत इंदिरा नगर भागातील बापू बंगला हा इंदिरा नगर मधील एक मोठा Landmark तसेच नाशिक व इंदिरा नगर मध्ये गेल्या ४ दशकापासून झालेल्या बदलांचा एक मूक साक्षीदार. इंदिरा नगर मधील एकदा पत्ता सांगायचे झाले तर बापु बंगल्या पासून चे त्या जागेचे लोकेशन आजही सांगितले जाते. गत काही वर्षापूर्वी तो बंगला पाडून तेथे एक कॉम्प्लेक्स उभारले आहे. तरी देखील बापू बंगला ही ओळख आजही कायम आहे. या बापू बंगल्याचा आठवणी लिहिल्या आहे खुद्द बापु बंगला उभारणारे संजय खानझोडे यांनी.
१९७७ साली मी मुंबई विद्यापिठाची अर्थशास्त्र घेऊन पदवी परीक्षा पास झालो.पुढे कायकरायचे ह्याचा आधी काहीच विचार केला नव्हता. मग त्याबद्धल घरात वडीलांनबरोबर चर्चा झाल्या परंतु नोकरी करायची नाही. एवढे नक्की होते, व वडिलांचा पण तोच सल्ला होता.मग व्यवसाय करायचा तर कोणता ? यावर बराच विचारविनामय झाला.माझा तांत्रिक विषयाकडे असलेला कल लक्षात घेवून शेवटी प्रिंटींग व्यवसाय सुरु करायचा असे ठरवले. खरे तर व्यवसायाची कुठलीही कौटुंबिकपार्श्वभूमी नव्हती, ना कुठलाही तांत्रिक वा व्यावसाईक अनुभव, म्हणून स्व-स्वभावानुसार ह्या व्यवसायाची पूर्ण माहिती घेण्याचे ठरवून जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, फोर्ट,मुंबई येथे असलेला प्रिंटींग टेकनोलोजी ह्या कॉलेज मध्ये मुद्दाम पार्ट टाईम कोर्स मधे अॅडमीशन घेतली व दिवसा प्रिंटींग प्रेस मध्ये शिकाऊ ऊमेंद्वारी सुरु केली ते हि कोणत्याही पगारा शिवाय. बरोबरीचे सर्व वर्ग मित्र नौकरी धंद्याला लागून पैसे कमवायला लागले असतांना मी मात्र प्रेस मधे हात काळे करत होतो नातेवाईक , शेजार-पाजारच्यानी माझ्या ह्या निर्णयाला खुप नावे ठेवली, नाके मुरडली. पण मी माझा निर्णय कायम ठेवला. वडिलांच्या सरकारी नौकरी निमित आमचे जळगाव,अमरावती, सोलापुर,नाशिक, ठाणे, वैगेरे शहरांमधे राहणे झाले होते. पण नाशिकची थंड हवा, भरपूर पाणी व १९८० च्या दरम्यान नाशिक मधे होत असलेली औद्योगिक प्रगती, मुंबईला जवळ, वैगेरे ह्या सर्वांचा नीट विचार करून नाशिक येथे स्थाईक होऊन व्यवसाय करावयाचे नक्की ठरवले.
वर्ष १९७८ ला २ रुपये प्रति स्वे फूट दराने प्लॉट खरेदी
एकीकडे दिवसा प्रिंटींगप्रेस मधे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे, संध्याकाळी ५ ते ७.३० प्रिंटींग कॉलेज, रविवारी वा सुट्टीच्या दिवशी लग्नाच्या, मुंजीच्या फोटो ओर्डर घेऊन पौकेटमनी कमावणे व महिना दोन महिन्यांनी नाशिकला येऊन , घर बांधण्यासाठी प्लॉटची शोध मोहीम सुरु केली.२-३ ट्रीप नंतर १९७८ साली पंडित कॉलनी मधे राहणाऱ्या श्री दिक्षित ह्यांच्या हायवेजवळ असलेल्या ले-आऊट मधील ६००० चौ. फुटाचाप्लॉटनं. ५ ह्याचे २ रुपये प्रति चौ. फुटा पेक्षाही कमी दराने साठेखत केले. मात्र साठेखता चे खरेदीखत करण्यास २ वर्षाचा कालावधी गेला.व त्या दरम्यान जमिनीचे भाव वाढले, म्हणून मग श्री. दिक्षितानी तेव्हड्याच किमतीत ६००० चौ.फु प्लॉट ऐवजी ५००० चौ.फु. चा प्लॉट नं.१९ देऊ केला. पण म्हणतात ना “ Blessing in Disguise”, तसे आमच्या बाबतीत झाले. त्यामुळे आम्ही २०’ कॉलनी रोडवरून ४० फुटी मोठ्या रोड वर आलो. अश्या तऱ्हेने आज सर्वाना दिसतो त्या बा्पू बंगल्याची जागा नक्की झाली व एकदाचा बंगला बांधायला घेतला. मात्र एकंदरीत जागेवरील परिस्थिती खूपच प्रतिकूल होती. पाण्यासाठी बोअर घेतले ते पूर्णपणे कोरडे निघाले. सर्व रस्ते कच्चे, पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळणे दुरापस्त होते.
जुलै १९८१ मध्ये बंगल्याचे बांधकाम पूर्ण
१९८० चा काळ हा अंतुले साहेबांच्या राज्यातील होता. बाजारात सिमेंटची उपलब्धता अत्यंत कमी अस असल्यामुळे विटकाम वै., राख मिश्रित सागोळ मधे करावे लागले. स्लॅब मात्र सिमेंट मधे टाकला गेला. बांधकामाची काहीही माहिती नसल्याने बिल्डरने भरपूर फसवले,जे बांधकाम २०-२५ हजारात झाले असते त्या साठी ५५-६० हजार घेतले , शेवटी कसेतरी जुलै १९८१ मधे बंगल्याचे बांधकाम पूर्ण होऊन १ ऑगस्ट १९८१ ला आम्ही बंगल्यात राहण्यास आलो.
तुरळक वस्ती व विंचवाचे साम्राज्य
सुरवातीचे दिवस खूपच खडतर काढावे लागले. आजुबाजूला २००-२५० मीटरच्या परिसरात कोणतीहि व्यक्ती रहात नव्हती चारीही बाजूने सर्वत्र फक्त उजाड शेते होती . व त्यातील काही शेतामध्ये व्यापारी लोकांनी साठवलेला वाळलेल्या गवताच्या गन्जांचे दोन दोन मजली ढीग असायचे. सुरवातीच्या काळात तर “ गवताच्या गंज्या जवळ”असा पत्ता आम्ही लोकांना दिलेला आठवतो. मात्र ह्या वाळलेल्या गवतांच्या गंज्या मुळे विंचवाचे प्रमाणपण खूपच होते, त्यामुळे घरातील आम्हा सगळ्यांना एक-दोनदा तरी विंचू चावले होते. त्या वर कितीहि औषधे, इंजेक्शन घेतले तरी विंचवाचा डंख २४ तास राहायचाच.
स्व खर्चाने १५०० फुट लांब पाईप लाईन टाकून आणले पाणी
पाण्याचा कोणताहि पुरवठा नसल्याने समोरच्या सिद्धिविनायक सोसायटीच्या नळावरून सकाळी २० लिटरचे कॅन साइकलला मागे अडकऊन ३-४ चकरा मारून ६०-७० लिटर रोज पाणी आणत होतो.त्याकाळी आजच्या सारख्या प्लास्टिक च्या टाक्या मिळत नसल्याने २ सिमेंटच्या टाक्यात आणून त्यात नगर पालिकेचा टँकर मागून ते पाणी १५ दिवस पुरउन पुरउन दिवस काढावे लागायचे.काही काळा नंतर, आम्ही राहिला आलेलो बघून,नाशिकचे निवृत्त सरकारी वकील श्री प.रा.चांदे पण वास्तव्यास आले.मग आम्ही २,३ कुटुंबांनी मिळून नगरपालिकेची परवानगी घेऊन,आज असलेल्या सप्तशृंगी मिठाईच्या दुकाना पर्यंत आलेल्या नगरपालिकेच्या पाईप लाईन वरून स्वता:च्या खर्चाने १५०० फुटलांब ३/४” पाईप लाईन टाकून पाणी आणले व राहण्यास आल्यापासून साधारणपने १.५ वर्ष पाण्याचा अतिशय त्रास काढल्यावर बर्यापैकी पाणी मिळू लागले.
पावसाळ्यात दुचाकी हायवेवरील वजन काटा येथे ठेऊन चिखल तूडवत यावे लागत असे घरी
रस्त्याची परिस्थिती देखील ह्या पेक्षा फार काही वेगळी नव्हती. आता ज्याला इंदिरा नगर म्हणतात त्यातील सर्व रस्ते हे पूर्णता ज्याला डब्लू.बी.एम म्हणतात तसे होते. पावसाळ्यात तर परिस्तिथी खूपच दयनिय असायची, दुचाकी हायवे जवळ असलेल्या वजन काटया जवळ कोणाच्या तरी आवारात विंनती करून ठेऊन चिखल तूडवत घरी चालत यावे लागायचे.नंतर काही काळा नंतर जशी जशी वस्ती वाढू लागली तसे स्थानिक रहीवाश्यानी मिळून एक नागरी संघटना स्थापना केली व त्या संघटने तर्फे आवश्यक असणार्या सोई सुविधान साठी सरकार दरबारी पाठ पुरावा करू लागलो.
एप्रिल ८२ मध्ये शहर बससेवा सुरु
सिटी बस सुरु करण्यासाठी बराच काळ पाठपुरावा केल्यावर साधारण पणे एप्रिल ८२ मधे एसटी महामंडळा तर्फे इंदीरानगर रहिवाश्याच्या सोईसाठी बस सेवा सुरु झाली बस सर्विसचे ऊद्घाटन करण्यासाटी त्या वेळचे नाशिक महानगर पालिकेचे चीफ ऑफिसर असलेले श्री. तलरेजा साहेब उपस्थित होते. व आता जिथे ज्ञानेश्वर संकुल म्हणून वास्तू आहे त्या रिकाम्या प्लॉटवर छोटेखानी कार्यक्रम केला. श्री. तलरेजा साहेबांनी त्यांच्या भाषणात आग्रारोड पासुन आमच्या बापुबंगला पर्यंतचा मुख्यरस्ता हा डांबरीकारण करून देतो म्हणून जाहीर केले व शब्द दिल्याप्रमाणे ३ -४ महिन्यात, म्हणजे ऑगस्ट / सप्टेंबर ८२ मध्ये डांबरी रस्ता करून दिला.
आजोबांचे नाव बापु
वडील रिटायार्ड झाले असल्याने त्यांच्या इच्छेप्रमाणे बंगल्याला त्यांच्या वडिलांचे, म्हणजे माझ्या आजोबांचे नाव “बापु” हे देण्याचे त्यांनी ठरवले. अशा तऱ्हेने आमचा बंगल्याचे नामकर “बापु बंगला” असे झाले . काही दिवसांनी बंगल्याच्या वर सर्वांना दिसेल अश्या ठिकाणी पेंटर कडून मोठ्या व लपेटीदार अक्षरात “बापु बंगला” हे नाव टाकले. नाव छोटे, सुटसुटीत व लक्षात राहण्यास सोपे असल्याने बापुबंगला हे नाव सर्वांच्या लक्षात राहू लागले .
बापु बंगला बस स्टोप मुळे प्रसिध्द
सिटीबस सुरु झाल्यावर ती पंचवटी डेपोमधून रविवार कारंजा, मेहेर, सीबीएस, व्हाया मुंबईनाका आताच्या हॉटेल तपस्वीच्या जागी असलेल्या वजन काट्यावरून आत येऊन बापुबंगल्या पर्यंत येत असे व परत फिरून पंचवटीत जात असे. सुरवातीला ऑफिस, शाळांना जाणार्याना सोईस्कर अश्या वेळाना, दिवसाला फक्त पाचच फेऱ्या ठेवल्या होत्या. शहरात जाण्यास इतर काही सोय नसल्याने सर्बच बसनाचांगलीच गर्दी होत असे. दुसऱ्या stop पर्यंत बस फुल होऊन जायची बसायला जागा मिळायची नाही व मग शेवट पर्यंत उभे राहून जावे लागायचे म्हणून बहुतेक लोक बापु बंगल्याच्या पहिल्या stop वर येऊन आमच्या बंगल्याच्या कट्ट्यावर बसची वाट पाहत बसायचे यावरूनच बापुबंगला बस स्टाप हे नाव पडले व ते हळुहळू सर्वमुखी प्रसिद्ध झाले.बापू बंगला प्रसिद्ध होण्या मागचे खरे कारण हेच होते.
बापु बंगला पाणपोई
वडाळा पाथर्डी रोड वर साधारणपणे ९० नन्तर हळू हळू वस्ती व रहदारी वाढू लागली, ऊन्हाळ्यात बससाठी व इतर कामाला येणाऱ्या लोकांसाठी मी बापु बंगल्याच्या कोपरयावर आई वडिलांच्या आठवणी प्रीत्यार्त पाणपोई चालू केली नाशिकच्या प्रसिद्ध गावकरी पेपरचे मालक स्व. दादा साहेब पोतनीसां यांच्या हस्ते या पाणपोइचे उद्घाटन केले. साधारणपणे १९८७ साली वडिलांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी प्रित्यर्थ नाशिक शहरातून एस.एस.सी परीक्षेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला “बापुबंगला शिष्यवृत्ती सुरु केली होती. ती ८-१० वर्ष चालू होती. पण वडील गेल्यावर बंद पडली ती मी पुढे चालू ठेवायला हवी होती , ती बंद झाल्या बद्दल वाईट वाटते. या सर्व कारणांनी सुद्धा बापुबंगल्याचे नाव प्रसिद्ध होण्यास मदत झाली.
२०१० रोजी बंगल्याच्या जागी झाले कॉम्प्लेक्स
व्यवसायाला जागा कमी पडत असल्याने २०१० साली मी आमचा मुळ बापुबंगला पाडून ३ मजली कॉम्प्लेक्स बांधण्यास सुरु केले. पहिल्या व दुसर्या मजल्यावर Banquete hall सुरु केला, परंतु तो पर्यंत बापु बंगल्या ची गुडविल एवढी झाली होती कि मला त्याला “ बापुबंगला मंगल कार्यालय” हेच नाव देण्यावाचून पर्याय नव्हता.पण हा व्यवसाय माझ्या स्वभावाला साजेसा नसल्याने,खूप मेहेनतीने ऊत्तम सोयी व सजावट केली असताना सुद्धा मी ४-५ वर्षातच बंद केला
स्टेट बँक व अन्य नामांकित संस्था आहेत आज या वास्तू मध्ये
त्याचदरम्यान स्टेट बँकेला इंदिरानगर मधे त्यांची ब्रांच काढण्यासाठी जागेचा शोधघेत होते .भारतीय स्टेट बँक, इंदिरानगर शाखा,बापू बंगल्यात २०१० डिसेंबर पासुन सुरु झाली .आज बापुबंगल्यात स्टेटबँकची शाखा तसेच पहिल्या मजल्यावर एक व्यायम शाळा, दुसर्या मजल्यावर पंतप्रधान स्कील डेवलपमेंटचे कोर्स (लवकरच सुरु होणार आहेत ) व तिसर्या मजल्यावर बल्लाळ बोबडे क्लासेस आहेत .
आज बापुबंगला एक लॅन्डमार्कच न राहता आता आजुबाजू च्या ५०-६० बंगल्यांचा एरिया हा बापुबंगला परिसर म्हणूनच ओळखला जाऊ लागत आहे . काही वर्षापूर्वी बापू बंगल्या मागेच HDFC BANK ने त्यांची ब्रांच काढली व बँकेला नाव दिले बापू बंगला ब्रांच.
तर अशी आहे नाशिकच्या सर्वाना माहिती असलेल्या बापु बंगल्याची आत्ता पर्यंतची कहाणी.कालानुरूप जरी वास्तू चा उपयोग,आकार बदलला तरी त्याचाशी जोडलेल्या आठवणी या कायम असतात. आज नाशिक शहर तसेच इंदिरा नगर दाट वस्तीचा परिसर झाला असून अन्य अनेक शहरातून नागरिक येऊन इंदिरा नगर मध्ये राहत आहेत . त्यांना तसेच नव्या पिढीला देखील बापु बंगल्याचा इतिहास कळावा हाच या लेखाचा उद्देश .
Nice 👍👍👍👍👍👍👍